परभणी जिल्ह्यात पावसाच कहर सुरूच

परभणी जिल्ह्यात पावसाच कहर सुरूच

१० मंडळांमध्ये अतिवृष्टी, ९ गावांचा संपर्क तुटला

परभणी : परभणी जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच असून रविवारी, २८ सप्टेंबररोजी सकाळच्या अहवालानुसार मागील २४ तासांमध्ये जिल्ह्यात सरासरी ४४.५ मिमी पावसाची नोंद झाली असून पालम, पूर्णा आणि गंगाखेड तालुक्यातील १० मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे अनेक नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली असून ९ गावांचा संपर्क तुटला आहे. गोदावरी, दुधना, पूर्णा नद्यासह लहान मोठ्या नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे. पूरस्थिती आणि अतिवृष्टीमुळे खरिप पिके पूर्णत: उद्धवस्त झाली असून शेतकऱ्यांमधून मदतीसाठी आक्रोश सुरू आहे.
परभणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळपर्यंत सर्वाधिक पाऊस पालम तालुक्यातील पेठशिवणी येथे १२६.३ मिमी इतका नोंदविला गेला आहे. तर टाकळी कुंभकर्ण ६९.८, राणीसावरगाव ६६, माकणी ७४.८, पूर्णा ६९.५, चुडावा ७३, कावलगाव ६६, पालम ८१.३, चाटोरी ६६, बनवस ६७.३, पेठशिवणी १२६.३ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान (जून ते सप्टेंबर) ७६१ मिमी असून, १ जून ते आजपर्यंत ९२० मिमी (१२२.७%) पावसाची नोंद झाली आहे.

प्रकल्पातून मोठा विसर्ग

परभणी जिल्ह्यातील अनेक लघु व मध्यम प्रकल्प तसेच येलदरी, निम्नदुधना तसेच सिद्धेश्वर ( जि.हिंगोली) प्रमुख धरणे भरली असून त्यातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. याशिवाय मासोळी मध्यम प्रकल्प, ढालेगाव उच्चपातळी बंधारा, उच्चपातळी तारुगव्हाण बंधारा, मुदगल उच्चपातळी बंधारा, मुळी बंधारा आणि दिग्रस उच्च पातळी बंधारा प्रकल्पही भरले आहेत.

९ गावांचा संपर्क तुटला

९ गावांचा संपर्क तुटला आहे, परंतु सद्यस्थितीत कोणताही धोका नसून प्रशासन नागरिकांच्या संपर्कात आहे. गंगाखेड तालुक्यातील खळी, गोंडगाव, चिंचटाकळी, सायाळा व सुनेगाव या ५ गावांचा, पूर्णा तालुक्यात देवठाणा ते परभणी रस्ता बंद झाल्याने दोन, पालम तालुक्यातील भुजबळ सांगवी, जिंतूर तालुक्यात जिंतूर – सेनगाव रस्त्यामुळे १ गावाचा संपर्क तुटला आहे.

नद्या इशारा पातळीच्या जवळ

ढालेगाव गोदावरी नदीची सद्यस्थिती पाणीपातळी ३९८.०७ मीटर असून इशारा पातळी ३९८.७५ मीटर आहे. गंगाखेड येथील गोदावरी नदी पुलाची सद्यस्थिती पाणीपातळी ३७५.२० मीटर असून धोका पातळी ३७५.०० मीटर आहे. पूर्णा नदीवरील पुलाची सद्यस्थिती पाणीपातळी ३७१.६१ मीटर असून इशारा पातळी ३७२.०० मीटर आहे. दुधना नदी झरी येथील पुलाची सद्यस्थिती पाणीपातळी ३८०.९६ मीटर असून इशारा पातळी ३८४.२० मीटर आहे. दरम्यान, पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीकाठच्या डाकूपिंपरी आणि रामपुरी या २ गावातील एकूण ७० नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्यांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बाभळगाव येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.

फोटो ओळी – जिंतूर (जि.परभणी) तालुक्यातील येलदरी धरणातून रविवारी मोठा विसर्ग सुरू होता. यामुळे पूर्णा नदीला पूर आला आहे.

पूर्ण…

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!