श्रीमद् ज्ञानेश्वरी प्रवचनमालेला प्रतिसाद
१५ ऑगस्टला माऊलींचा जन्मोत्सव
सेलू : शिर्डीचे संत श्री साईबाबांचे सद्गुरू आणि सेलू शहराचे ग्रामदैवत श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान व श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान यांच्या वतीने श्रावणमासानिमित्त २५ जुलैपासून सेलू येथे आयोजित श्रीमद् ज्ञानेश्वरी प्रवचनमालेला श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
प्रवचनमालेचे हे २१ वे वर्ष आहे. यावर्षी पुरुषोत्तम महाराज वालूरकर यांच्या प्रवचनाने सुरूवात झाली. २३ ऑगस्टरोजी सांगता आहे. दररोज रात्री ८ ते ९ या वेळेत आध्यात्मिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती आपली सेवा रुजू करत आहेत. रविवारी, ३ ऑगस्टरोजी ब्रह्माकुमारी सीमा बहेन यांचे हरिपाठातील ‘देवाचिये द्वारी, उभा क्षण भरी’ या अभंगावर प्रवचन झाले. त्यांनी सलोकता, समिपता, स्वरूपता आणि सायुज्जता या चार मुक्तींवर अभ्यासपूर्ण विवेचन केले. विकारशस्त्रूंवर विजय मिळविण्यासाठी, मी कोण आहे याचे आत्मभान ठेवून प्रार्थना आणि ध्यान, समर्पण आणि परोपकारभावाने सेवा करण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले.
१७ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट या कालावधीत सकाळी ७ ते १० या वेळेत श्री ज्ञानेश्वरी पारायण आयोजित करण्यात आलेले आहे. २३ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता शंतनू महाराज पाठक (वालूर) यांचे काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने सांगता आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
१५ ऑगस्टला माऊलींचा जन्मोत्सव
श्रावणमासानिमित्त आयोजित श्री ज्ञानेश्वरी प्रवचन व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे हे २१ वे वर्ष आहे. कोविड काळातदेखील आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ही प्रवचन सेवा अखंडपणे चालवली गेली आहे. या प्रवचनमालेचे वैशिष्ट्य म्हणजे प्रवचनासाठी निमंत्रित सेवेकरी मानधन घेत नाहीत. वेळेची शिस्त आणि आयोजनातील साधेपणा आजही जपला गेला आहे. यावर्षी १५ ऑगस्टरोजी संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जंयती वर्षानिमित्त माऊलींचा आगळावेगळा जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे, असे आयोजकांनी सागंतिले.