सेलूच्या नूतन कन्या प्रशालेत गुणवंतांचा गौरव
डॉ.मधुरा आनंदगावकर यांचे यशासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन
सेलू : विद्यार्थिनींनी यशाची शिखरे गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावे, मेहनत घ्यावी आणि प्रशालेचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन डॉ. मधुरा (अष्टूरकर) आनंदगावकर यांनी केले. सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेद्वारे संचालित श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेचा वर्धापन दिन शुक्रवारी, १ ऑगस्टरोजी झाल. यानिमित्ताने गुणवंत विद्यार्थिनी सत्कार सोहळ्यात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष नंदकिशोरजी बाहेती होते. व्यासपीठावर संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. व्ही. के. कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, सदस्य प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, दत्तराव पावडे, राजेशजी गुप्ता, अझीझखॉं पठाण, माता पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा भारती खंदारे, मुख्याध्यापिका निशा पाटील, उपमुख्याध्यापक परसराम कपाटे, पर्यवेक्षक दत्तराव घोगरे व भालचंद्र गांजापुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात लेझीम पथकाच्या सादरीकरणाने झाली. दीपप्रज्वलन आणि माता सरस्वती, बाळ गंगाधर टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमापूजनाने सोहळ्याचा प्रारंभ झाला. पूजा महाजन व विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते प्रशालेच्या दैनंदिनीचे विमोचन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थिनी अनया ढाकणे, सिद्धी पवार आणि हर्षदा मोगल यांनी महापुरुषांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
सतीश कुंडीकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी प्रमुख अतिथी डॉ. मधुरा आनंदगावकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. प्रशालेतील सर्व गुणवंत विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी केले, तर दत्तराव घोगरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.