लोकसभा निवडणूक : जिंतूर येथील प्रशिक्षणाला १७५ जणांची दांडी; प्रशासन बजावणार कारणे दाखवा नोटिसा
जिंतूर : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने परभणी लोकसभा मतदारसंघातील जिंतूर विधानसभा क्षेत्रातील २ हजार २६ मतदान मतदान केंद्राध्यक्ष, अधिकारी व कर्मचाऱ्यांना नेमणूक आदेश बजावण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांचे शुक्रवारी, २९ मार्च रोजी पहिले निवडणूक प्रशिक्षण जिंतूर येथे पार पडले. पहिल्याच प्रशिक्षणाला १७५ मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. दरम्यान, गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असून तत्काळ खुलासा व अहवाल सादर करण्याबाबत आदेशीत करण्यात आले आहे,अशी माहिती प्रशासनाने दिली.
जिंतूर येथील गायत्री लॉन्स येथे दोन सत्रात आयोजित मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना पहिले प्रशिक्षण देण्यात आले. या प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, सहायक निवडणूक अधिकारी संगीता सानप, तहसीलदार राजेश सरवदे, दिनेश झांपले, नायब तहसीलदार सुग्रीव मुंडे, कच्छवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे म्हणाले, ” निवडणूक हे राष्ट्रीय कार्य असून सर्व निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांनी आत्मविश्वासाने काम करावे. निवडणूक मतदान विषयक प्रकिया काळजीपूर्वक समजून घ्यावी. आपापल्या जबाबदार्यांप्रती सर्तक राहणे आवश्यक आहे.” निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून सर्व स्तरावर तयारी सुरू असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संगीता सानप यांनी दिली. तहसीलदार सरवदे, मुंडे यांनी पीपीटीद्वारे निवडणूक प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.निवडणुकीतील महत्त्वाचे बदल, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट हाताळणी, निवडणूक साहित्य, मतदान साहित्य वितरण, स्वीकृती व तपासणी, अभिरूप मतदान यासह निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मास्टर ट्रेनरमार्फत हॅंडस् ऑन ट्रेनिंगच्या माध्यमातून ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅटची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे देण्यात आली. संतोष मलसटवाड यांनी ईव्हीएम मशीनची माहिती दिली. नायब तहसीलदार विजय मोरे, कच्छवे, प्रदीप मुनेश्वर, हरिष टाक, विजय टेकाळे, अविनाश सुत्रावे, एकनाथ जाधव, गजानन साळवे, लक्ष्मण तळेकर, सुनील राठोड, राजू घुगे आदींसह मास्टर ट्रेनर तसेच जिंतूर, सेलू तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.