महावाचन उत्सव – २०२४ : ग्रंथ प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सेलूतील शिक्षण विभाग व स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाचा उपक्रम
सेलू : येथील शिक्षण विभाग पंचायत समिती व स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासनाचा महावाचन उत्सव – २०२४ अंतर्गत तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या सभागृहात शुक्रवार (दि. ३०) रोजी करण्यात आले होते. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षणाधिकारी प्राथमिक, सुनील पोलास यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत, प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे यांची उपस्थिती होती. ग्रंथ प्रदर्शनास भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना कवी डॉ. अशोक पाठक, कवी प्रा.हनुमान व्हरगुळे, साहित्यिक पु.ना.बारडकर यांनी मार्गदर्शन केले. दिव्यांग शिक्षक चंद्रकांत सोळंके यांनी ब्रेल लिपीत पुस्तके मांडली होती. तसेच दिव्यांग विद्यार्थी सुशांत शिंदे याने ब्रेल लिपीतील ग्रंथाचे वाचन व गणिती क्रिया करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्र शासनाच्या ‘किशोर’ या मासिकात कथा प्रसिद्ध झाल्याबद्दल नूतन विद्यालयातील वैष्णवी मस्के या विद्यार्थीनीचा व माधव गव्हाणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शहरातील विविध शाळेतील १४३९ विद्यार्थ्यांसह शिक्षक, केंद्र प्रमुखांनी ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिता काळे यांनी केले. सूत्रसंचालन सुमिता सबनिस यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ.शरद ठाकर यांनी केले. महावाचन उत्सव उपक्रम यशस्वीतेसाठी रामकीशन कटारे, सुरेश हिवाळे, स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाचे सचिव चंद्रशेखर मुळावेकर, ग्रंथपाल, अंजली पद्माकर, अश्विनी आम्ले, माधव गायकवाड, रमेश मरेवाड, महादेव आगजाळ, अनिरुद्ध टाके यांनी पुढाकार घेतला.
परभणीतील साहित्यिकांच्या ग्रंथ दालनाने लक्ष वेधले
कवी बी रघुनाथ, प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक आसाराम लोमटे, केशव खटींग, जीवन आनंदगावकर, केशव बा वसेकर, राम निकम, बा.बा.कोटंबे, सुरेश हिवाळे, सुमिता सबनिस, प्राचार्य. डॉ शरद कुलकर्णी, भगवान काळे , भारत काळे, बबन आव्हाड, राजेश रेवले, मणीक पुरी, सरोज देशपांडे, अर्चना डावरे, अरविंद सगर, हनुमान व्हरगुळे, त्र्यंबक वडसकर, गंगाधर गायकवाड, डॉ.जयश्री सोन्नेकर, अमोल देशमुख, शिवाजी मरगीळ या परभणीतील साहित्यिकांच्या ग्रंथांचे वेगळे दालन ग्रंथ प्रदर्शनात केले होते. ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.