आमदार बोर्डीकरांचा रेल्वेमंत्र्यांना फोन; धनेगावच्या अंडरग्राउंड रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी
सेलू : सेलू तालुक्यातील सेलू-परभणी रेल्वे ट्रॅकवरील सेलू रेल्वे स्थानकापासून दोन किमी अंतरावर असलेल्या सेलूवरून धनेगावकडे जाणाऱ्या अंडरग्राउंड रस्त्यासाठी आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांना फोन करून रस्ता तयार करून शेतकरी व धनेगाव ग्रामस्थांची अडचण दूर करण्यासाठी साकडे घातले. गुरूवारी, ५ सप्टेंबर रोजी तालुक्यातील धनेगाव व सेलूतील शेतकर्यांनी आमदार बोर्डीकर यांची भेट घेतली व तसेच दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या या अंडरग्राउंड रस्त्याअभावी शेतकरी व ग्रामस्थांचे होणारे हाल याचा पाढा वाचला. आमदार बोर्डीकर यांनी तात्काळ दखल घेऊन केद्रीय रेल्वे मंत्र्याना फोन करून शेतकर्यांच्या व्यथा मांडल्या; तसेच दमरे नांदेडचे डीआरएम यांच्याशी संपर्क करून तातडीने संबंधित अंडरग्राउंड रस्ता तयार करण्यबाबत सूचना दिल्या.
या वेळी धनेगावचे उपसरपंच श्याम कटारे, शिवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार नावाडे, अनुप गुप्ता, गणेश गोरे, विशाल लोया, सुरेश खेत्रे, श्रीधर खेत्रे, व्यंकटेश काबरा, सूर्यकांत जाधव, जकी पठाण, बाळू खेत्रे, हारूण बागवान, श्रीहरी कटारे, बबन भोसले, सुखानाना कटारे, रमेश खेत्रे, जब्बारभाई, रंगनाथ काळे, विशाल गोरे आदींसह धनेगावचे ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.