विभागीय टेबल टेनिस स्पर्धा उत्साहात; ३५० खेळाडूंचा सहभाग
परभणी : जिल्हा क्रीडा परिषद, परभणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,आणि जिल्हा हौशी टेबल टेनिस असोसिएशनच्या वतीने ६ सप्टेंबर रोजी आयोजित छत्रपती संभाजीनगर शालेय विभागस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे उद्घाटन उत्साहात झाले. छत्रपती संभाजी नगर विभागातून ३५० पेक्षाअधिक खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत १४, १७, आणि १९ वर्षांतील मुले आणि मुलींच्या विविध वयोगटांत स्पर्धा घेतल्या गेल्या. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला.
स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वेळी परभणी जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे म्हणाल्या, “शालेय क्रीडा स्पर्धेतून खेळाडू निर्माण होतात. त्यांच्या कौशल्याला वाव मिळतो आणि यामधून आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतात. शालेय जीवनात एकतरी खेळ खेळणे आवश्यक आहे.”
प्रमुख पाहुणे म्हणून परभणी जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे सचिव गणेश माळवे, सहसचिव डी.पी.पंडित, तालुका क्रीडाधिकारी सुयश नाटकर, रोहन औंढेकर, धनंजय बनसोडे, बाबासाहेब हेलसकर, सतिश नावाडे आदींची उपस्थिती होती. पंचप्रमुख म्हणून चेतन मुक्तावर, विक्रम हत्तेकर, नरसिंह चाटे, तुषार जाधव, हर्षवर्धन घाडगे साक्षी देवकाते, मानसी बोरवले, भूमिका बोरोळे, सौरभ मस्के, सानिका देशमुख, गौरी पवार, प्रेरणा गोरे यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकाश पंडित, धीरज नाईकवाडे, योगेश आदमे, आणि आशिष परदेशी, चैतन्य पाळवदे, अनुराग आंमटी यांनी परिश्रम घेतले.