गणेशोत्सव व्याख्यानमाला : ‘ संतवाणी ‘ ने सेलूकर भक्तीरंगात दंग
कलावंतांच्या बहारदार सादरीकरणाला रसिकांची भरभरून दाद
सेलू/परभणी : सेलू येथील ६३ व्या गणेशोत्सव व्याख्यानमालेची सांगता सोमवारी, १६ सप्टेंबररोजी झाली. या वेळी बालगायकांसह स्थानिक कलावंतांनी सादर केलेल्या ‘ संतवाणी महाराष्ट्राची ‘ या कार्यक्रमाला सेलूतील रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. महाराष्ट्रातील वारकरी संत परंपरेतील संतांच्या रचनांना मधुर स्वरांनी सजवून गायक कलावंतांनी श्रोत्यांना भक्ती रसरंगात दंग करून टाकले.
उद्घाटनप्रसंगी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, माजी जिल्हा परिषद सभापती अशोक काकडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, व्याख्यानमाला अध्यक्ष संतोष पाटील, चिटणीस अजित मंडलिक, काशिनाथ पल्लेवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. आहे. यानिमित्ताने उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात ५० हून अधिक गायक कलावंतांनी सहभाग घेत उत्कृष्ट सादरीकरण केले. गिरीश दीक्षित, अवधूत दहिवाल, आनंद राऊत (तबला) गंगाधर कान्हेकर (मृदंग), सच्चिदानंद डाखोरे (सिंथेसायझर), पूजा तोडकर (संवादिनी), संजय मंडलिक (टाळ) यांनी साथसंगत केली. प्रा.संजय पिंपळगांवकर, सच्चिदानंद डाखोरे, पूजा तोडकर यांनी संयोजन केले.
कार्यक्रमाची सुरुवात ‘रुप पाहता लोचनी’ या संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाने झाली. अथर्व तोडकर, प्रज्योत पांचाळ, अर्जुन इंगळे, श्रुती कुलकर्णी, स्नेहल जोगदंड वैष्णवी बोठे यांच्या समुहाने हा अभंग सादर केला. ‘सुंदर ते ध्यान’ हा संत तुकारामांचा अभंग देवांश तोडकर, श्लोक वाशिंबे, प्राजक्ता खरड, शर्वरी मोरे, श्रीशा लाडाने, शिवांश बोराडे, तनुश्री कोल्हे, लावण्या शेरे, अल्फीया सय्यद, भाव्या बुरेवार, रोहिणी बोराडे यांनी सादर केला. ‘नको देवराया’ हा संत कान्होपात्रा यांचा अभंग अर्निका घोडके, सुविरा घोडके, प्रेरणा काष्टे, अभिनिवेश मोगल, दर्शना जोशी, आर्या घांडगे, गौतमी मगर, ईश्वरी ताल्डे यांच्या समुहाने सादर केला. संत जनाबाई यांची रचना ‘धरीला पंढरीचा चोर’ अलका धर्माधिकारी, सुरेखा चारठाणकर, सुषमा दामा, सीमा सूक्ते, शुभांगी मोहकरे, रेणुका बोठे, रेणुका वाकडीकर, सीमा आष्टीकर, मीरा देशमुख यांनी सादर केली. तर ‘हरी भजनाविण काळ घालवू नको रे’ हा संत सोयरा यांचा अभंग ज्ञानेश्वरी शिंदे, भक्ती शिंदे, शिवम कणसे, सायली दिग्रसकर, भास्कर शिंदे यांनी सादर केला. संत सावता महाराज यांचा ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’ हा अभंग शिरीष संगई, सुरेंद्र दिशागत, बंडूनाना कदम, सच्चिदानंद डाखोरे यांनी सादर केला.
‘अमृताहुनी गोड नाम तुझे देवा’ हा संत नामदेव यांचा अभंग आशा सावजी, प्रीती राठी, प्रीती सराफ, मंजुषा बोराडे, संस्कृती सावजी यांनी सादर केला. ‘त्रिपुरावरी काशीपुरी’ हा संत एकनाथ महाराज यांचा अभंग अनघा पांडे, मनीषा पांडे, रमा बाहेती, सीमा आष्टीकर, श्रद्धा तेजबंद, पद्मजा खारकर, सायली दिग्रस्कर यांनी सादर केला. ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ हा संत चोखामेळा यांचा अभंग डॉ.विलास मोरे, डॉ.राजेंद्र मुळावेकर, संजय मंडलिक, लक्ष्मीकांत डिग्रसकर, सतीश ताठे यांनी सादर केला. सर्व गायक कलावंतांनी सादर केलेल्या ‘अजी सोनियाचा दिनु, हेचि दान दे गा देवा’ या भैरवीने सांगता झाली. व्याख्यानमालेसाठी पदाधिकारी, सदस्य तसेच मीडिया समन्वयक गंगाधर कान्हेकर, केशव डहाळे, अरूण रामपूरकर आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.