वगळलेली नावे तत्काळ मतदारयादीत समाविष्ट करा

वगळलेली नावे तत्काळ मतदारयादीत समाविष्ट करा

माजी आमदार भांबळे यांचे जिल्हाधिकार्‍यांंना निवेदन

परभणी : जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघातील ४ हजार मतदारांंची नावे राजकीय हेतूने वगळण्यात आल्याचा आरोप करत, ही नावे तत्काळ मतदार यादीत समाविष्ट करावीत अशी मागणी करणारे निवेदन माजी आमदार विजय भांबळे व खासदार संजय जाधव यांनी जिल्हाधिकार्‍यांना बुधवारी दिले आहे.
अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, जनार्दन विधाते, विनायक पावडे आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, जिंतूर-सेलू मतदार संघात ज्या मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मतदान केले, त्या ४ हजार मतदारांची नावे भाजपच्या काही नेत्यांनी व कार्यकर्त्यानी ७ नंबरचा फॉर्म परस्पर दाखल करून हेतूपुरस्सर मतदार यादीतील नावे कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. ती नावे कमी करण्यात येऊ नये तसेच बाहेर राज्यातील व इतर जिल्ह्यातील रहिवाशी असणार्‍या लोकांंची बोगस कागदपत्रांच्या आधारे आधारकार्ड, शिधापत्रिका, लाईटबिलवर खाडाखोड करून मतदार यादीत नावे वाढविण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही केला आहे. हयात असणार्‍या मतदारांची नावे मयतांच्या यादीत टाकून नावे कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच सेलू व जिंतूर तालुक्यासह सेलू शहर व जिंतूर शहरात अशा प्रकारचे प्रयत्न सुरू असल्याचेही नमूद केले आहे. असे प्रकार होत असतील तर संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी; अन्यथा महाविकास आघाडी जिंतूर-सेलू यांच्याकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!