लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क बजवावा  : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदानाचा हक्क बजवावा  : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे

परभणी  : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी या 4 विधानसभा मतदार संघासाठी बुधवार, 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान तर शनिवार, 23 नोव्हेंबर, 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची परभणी जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी मतदानाचा हक्क अवश्य बजवावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते यांच्यासह प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हा निवडणुक अधिकारी श्री. गावडे म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघासाठी निवडणुकीची अधिसूचना मंगळवार, 22 ऑक्टोबर, 2024 रोजी प्रसिद्ध होईल.

उमेदवारांना नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक मंगळवार, 29 ऑक्टोबर, 2024 असा आहे. नामनिर्देशनपत्राची छाननी बुधवार, दिनांक 30 ऑक्टोबर, 2024 रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस सोमवार, दिनांक 4 नोव्हेंबर,2024 आहे. या निवडणूकीसाठी बुधवार, 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होईल तर शनिवार, 23 नोव्हेंबर, 2024 मतमोजणी होईल. तर सोमवार, 25 नोव्हेंबर, 2024 रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. परभणी जिल्ह्यात जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी या 4 विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.

परभणी जिल्ह्यात 15 ऑक्टोबर, 2024 पर्यंत 95-जिंतूर विधानसभा मतदारसंघात 1 लाख 98 हजार 932 पुरुष, 1 लाख 86 हजार 440 महिला, 11 तृतीयपंथी असे 3 लाख 85 हजार 383 मतदारांची संख्या आहे. 96-परभणी विधासभा मतदारसंघात 1 लाख 77 हजार 789 पुरुष, 1 लाख 70 हजार 372 महिला, 11 तृतीयपंथी असे 3 लाख 48 हजार 172 मतदारांची संख्या आहे. 97-गंगाखेड विधानसभा मतदारसंघात 2 लाख 17 हजार 169 पुरुष, 2 लाख 01 हजार 997 महिला, 5 तृतीयपंथी असे 4 लाख 19 हजार 171 मतदारांची संख्या आहे. 98-पाथरी विधानसभा मतदारसंघात 2 लाख 01 हजार 824 पुरुष, 1 लाख 88 हजार 721 महिला, 2 तृतीयपंथी असे 3 लाख 90 हजार 547 असे एकूण 15 लाख 43 हजार 273 मतदार आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!