राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मोहीम : जिंतूर बसआगारात जनजागृतीपर विविध उपक्रमांना सुरूवात
आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण यांची माहिती, आगाराच्या दर्शनी भागात बॅनर झळकले
जिंतूर/परभणी : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मोहिमेअंतर्गत महिनाभर जिंतूर बस आगारात राबविण्यात येत असलेल्या जनजागृतीपर उपक्रमांना सुरूवात झाली आहे. ३० जानेवारीपर्यंत मोहीम प्रभावीपणे राबवणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण यांनी दिली. जिंतूर बसआगारात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना मोहीमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री चव्हाण बोलत होते. जिंतूर आगारातील विशेषत: प्रत्येक चालक वर्गास सुरक्षितता बाबत योग्य त्या सूचना मार्गदर्शन व प्रबोधन स्थानिक आगार प्रशासनाकडून केले जात आहे. या वेळी आगाराच्या दर्शनी भागात राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मोहीमेबाबत बॅनर लावण्यात आले.
बस आगारात प्रवाशी मित्र संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन रायपत्रेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिना कार्यक्रम प्रभावीपणे राबवत असतांना आगार व्यवस्थापक यांच्यातर्फे चालक वर्गाचे प्रबोधन केल्या जात आहे. चालक बांधवानी वेगावर नियंत्रण ठेवणे, मार्गस्थ होतांना रस्त्याच्या बाजूने लावलेल्या फलकाच्या सूचनेचे काटेकोरपणे पालन करणे, सायंकाळी व पहाटे गाडीचे दिवे चालू ठेवणे, लांब पल्ल्याच्या वाहनांनी नियमित गाडीची तपासणी करून टायर, ब्रेक आरसे, दिवे यांचे निरीक्षण करणे, हायवेवर मार्गस्थ होतांना सतत वेळोवेळी लेन बदलू नये, योग्यवेळी निरीक्षण करून लेन बदलावी, वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे, गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे टाळावे ,धूम्रपान, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, डाव्या उजव्या बाजूला वळताना इंडिकेटरचा आवर्जून वापर करावा. अन्य चालकासोबत संयमाने वागावे आदी मार्गदर्शक सूचना करत आगार व्यवस्थापक आनंद चव्हाण यांनी चालक वर्गाने प्रबोधन केले.
ही मोहीम १ जानेवारी ते ३० जानेवारी पर्यत राबवण्यात येणार आहे. या वेळी स्थानक प्रमुख आर.एस.सोनुने, वरिष्ठ लिपिक प्रल्हाद मुंढे, वाहन परीक्षक संजीव भांबळे, प्रवासी महासंघाचे अध्यक्ष सचिन रायपत्रीवार, लिपिक गुणीरत्न वाकोडे, एन.एम.जाधव, सुरक्षा रक्षक सय्यद समी व चालक वर्ग उपस्थित होते.