पोदार जंबो किड्सचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
‘राष्ट्राच्या भावना’ या विषयावर विद्यार्थ्यांचे अनोखे सादरीकरण
जिंतूर : येथील पोदार जंबो किड्सच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडला. लहानग्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक आणि कलात्मक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. ‘राष्ट्राच्या भावना’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात देशभक्तीपर गीत, नृत्य आणि नाट्यछटांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी देशप्रेमाचे अनोखे दर्शन घडवले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणासोबतच पालकांनीही आपल्या मुलांच्या टॅलेंटला दाद दिली. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी नेमीनाथ दंडवते, उपमुख्याधिकारी अनिल समिंद्र, केंद्रप्रमुख के.सी.घुगे, माजी नगरसेवक ॲड. गोपाळ रोकडे, गणेश कुऱ्हे आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षणाधिकारी प्रा.विठ्ठल भुसारे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. संस्थेच्या प्राचार्या इंजि.आशा दराडे यांनी आपल्या प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि शिक्षक व पालकांचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दीपिका मोहारे, सुरेखा काळे, सुनीता घुगे, उषा चट्टे, वर्षा कांदे यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्साह आणि पालकांचा अभिमान स्पष्टपणे दिसून येत होता. या भव्य कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून त्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळाले.
‘विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सर्वांचे योगदान आवश्यक : नेमीनाथ दंडवते
या वेळी बोलताना मुख्याधिकारी नेमिनाथ दंडवते यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण शहरवासियांनी योगदान देण्याची गरज व्यक्त केली. “विद्यार्थ्यांचा विकास हा केवळ शाळेपुरता मर्यादित नसतो. त्यासाठी संपूर्ण समाज आणि शहराचा सहभाग महत्त्वाचा असतो. समृद्ध शैक्षणिक वातावरण, योग्य सुविधा, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे आणि सकारात्मक सामाजिक वातावरण विद्यार्थ्यांच्या वाढीस चालना देतात,” असे मत त्यांनी व्यक्त केले.