आदिवासी लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
परभणी, दि. 14 : सन 2024-25 या आर्थिक वर्षातील केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत अतिरीक्त मंजुर आराखड्यातील योजनेनुसार परभणी जिल्ह्यातील आदिवासी लाभार्थ्यांनी योजनांसाठी इच्छुक त्या भागातील लाभार्थ्यांना अर्ज देणे व स्वीकारण्यासाठी अंतर कमी व्हावे या उद्देशाने प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी जिल्हा हिंगोली येथे व पंचायत समिती, जिंतुर येथे दि. 20 फेब्रुवारी, 2025 रोजी पासुन ते दि. 13 मार्च, 2025 रोजी पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शासकीय सुट्टीचे दिवस वगळता सादर करावेत असे आवाहन प्रकल्प अधिकारी डॉ. सुनिल बारसे यांनी केले आहे.
आदिवासी लाभार्थ्यांना 85 टक्के अनुदानावर विविध व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य करणे (नळ फिटींग, इलेक्ट्रिकल, अॅटोमोबाईल, सुतार काम व इतर व्यवसाय) या योजनेसाठी रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्न (तहसिल), अपंग/विधवा/ परितक्त्या दारिद्रय रेषेखालील असल्यास प्रमाणपत्र, राशन कार्ड, शासकीय सेवेत नसल्याचे प्रमाणपत्र, प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र, आधारकार्ड कागदपत्रांची आवश्यकता आहे.
तर आदिवासी बचत गटांना 85 टक्के अनुदानावर पत्रावळी व द्रोन तयार करण्याचे मशिन घेण्यासाठी अर्थसहाय्य करण या योजनेसाठी रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्न (तहसिल), आधार कार्ड, राशन कार्ड, शासकीय सेवेत नसल्याचे प्रमाणपत्र, 1 ते 6 सर्व सदस्य, बचत गटातील सदस्यांची यादी, बचत गटाचा ठराव, बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र कागदपत्रांची आवश्यकता आहे.
उपरोक्त योजनांमध्ये अंशतः पुर्णतः बदल करण्याचे तसेच वरीलपैकी कोणतीही योजना राबविण्याचा अथवा न राबविण्याचा अधिकार प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी जि. हिंगोली यांनी राखुन ठेवलेला आहे. विहित मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तरी प्रकल्पांतर्गत असलेल्या लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयात अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी डॉ. सुनिल बारसे यांनी केले होते.