वरिष्ठ व निवड श्रेणी : शिक्षक प्रशिक्षणाला उत्साहात सुरूवात
परभणीमध्ये १२१५ शिक्षकांचा सहभाग
परभणी : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्याद्वारे आणि परभणी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने शिक्षकांच्या वरिष्ठ आणि निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणाला सोमवारी, दोन जून रोजी उत्साहात सुरुवात झाली. प्रशिक्षणात यंदा प्रथमच संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात आणि एकाच वेळी राज्यस्तरीय ऑनलाइन चाचणी सोडविण्याची व्यवस्था करण्यात आली.
हायब्रीड आणि रियल टाइम स्वरूपातील हे प्रशिक्षण १२ जूनपर्यंत चालणार आहे. परभणी जिल्ह्यातील एक हजार २१५ शिक्षकांनी नोंदणी केलेली आहे. पाथरी रोड वरील जिजाऊ ज्ञानतीर्थ शैक्षणिक संकुल आणि धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठान परिसरात विविध चार गटांत दररोज सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाचपर्यंत पाच तासिकामधून प्रशिक्षण दिले जात आहे. प्रत्येक तासिकेला प्रशिक्षणार्थींची उपस्थिती अनिवार्य आहे.
दररोज परिपाठ, गटचर्चा आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०, राज्य अभ्यासक्रम आराखडा, शिक्षण हक्क कायदा, शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा, ऑनलाइन शिक्षण, सायबर सुरक्षा, पर्यावरण व आपत्ती व्यवस्थापन, व्यवसाय शिक्षणसह ताणतणावाचे व्यवस्थापन, मूल्यमापन, कृती संशोधन आदी विषयांचा समावेश आहे. चाचणी, स्वाध्याय, लेखी चाचणी, अहवाल लेखन असे एकूण ३०० गुणांवर आधारित मूल्यमापन होणार आहे. किमान ५० टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. पूर्वचाचणी ऑनलाइन आणि उत्तर चाचणी ऑफलाइन स्वरूपात लेखी असणार आहे. प्रत्येक तासिकेनंतर ऑनलाईन चाचणी आहे. पहिल्या दिवशी काही ठिकाणी मोबाईल नेटवर्कची समस्या जाणवल्याचे दिसून आले.
परभणी जिल्हास्तरावर ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, जिजाऊ ज्ञानतीर्थचे सचिव प्राचार्य नितीन लोहट आदींच्या सहकार्याने प्रशिक्षणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून इंटरॲक्टिव्ह डिजिटल बोर्डसह आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांच्यासह वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली डायटचे प्राचार्य डॉ.विकास सलगर, समन्वयक वरिष्ठ अधिव्याख्याता प्रा.डॉ.अनिल मुरकुटे, प्रा.अनिल जाधव, प्रा.शोभा मोकळे, प्रा.गणेश शिंदे, प्रा.नितीन जाधव आदींसह सुलभकांची मोठी टीम प्रशिक्षणासाठी परिश्रम घेत आहे.