सायकलवारीव्दारे वाचन संस्कृतीचा जागर
परभणीतील सायकलप्रेमींचा ३५० किमीचा प्रवास
परभणी : मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे मुलांवर होणारे दुष्परिणाम, त्यांच्यातील एकटेपणा आणि कुटुंबांमधील संवादाचा अभाव ही आजची गंभीर समस्या आहे. आजी-आजोबा आणि नातवंडांमध्ये गोष्टींतून होणारा संवाद तसेच कौटुंबिक वाचनाची जागा मोबाईल आणि टीव्हीने घेतल्याने, ही वाचनसंस्कृती पुन्हा रुजवण्यासाठी जनजागृतीची नितांत गरज आहे. याच उद्देशाने, होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीजचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक, सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचारी राजेंद्र खापरे ( परभणी) आणि कलाशिक्षक पांडुरंग पाटणकर (सेलू) यांच्या पुणे-आळंदी-पंढरपूर ते कुर्डुवाडी दरम्यान ३५० किलोमीटरच्या सायकलवारीला २९ जूनरोजी पुणे रेल्वे स्थानकापासून प्रारंभ झाला आहे. एक जूलैरोजी कुर्डुवाडी येथे वारीचा समारोप आहे.
या तिघांनी कोणतेही बॅकअप वाहन न घेता एकट्याने प्रवास केला आहे. पुणे सकाळी सायकलिंगला सुरुवात करून, त्यांनी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन लोणीकंद, उरळी, यवत, चौफुला, पाटस, कुरकुंभ मार्गे भिगवण येथे मुक्काम केला. ३० जून रोजी, इंदापूर येथील शालेय विद्यार्थ्यांना वाचनसंस्कृतीचे महत्त्व आणि मनोरंजनातून शिक्षण या विषयांवर मार्गदर्शन केले. अकलूज येथे तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेऊन सायकलवारी पंढरपूरला मुक्कामी थांबली. १ जुलै रोजी, वेळापूरहून निघून पालवी एड्स प्रकल्पाशी संवाद साधत विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे दर्शन घेऊन कुर्डुवाडी येथे समारोप आहे. या प्रवासात विविध शाळा, महाविद्यालये आणि कॉलेजमध्ये संवाद साधत कौटुंबिक वाचन आणि वाचनसंस्कृती रुजविण्यावर भर दिला जात आहे.
डॉ.पवन चांडक १ लाख ११ हजार किमीचा टप्पा पूर्ण
सायकलवारीतील डॉ. पवन चांडक यांची ही ११ वी सायकलवारी असून, या सायकलवारीने त्यांचे एकूण १ लाख ११ हजार किलोमीटर सायकलिंग पूर्ण होईल. २०१३ पासून ते २०२४ पर्यंत त्यांनी एचआयव्ही/एड्स जनजागृतीसोबतच एचआयव्ही संक्रमित बालकांच्या शिक्षण, आरोग्य आणि पुनर्वसनासारख्या मूलभूत प्रश्नांवर जनसामान्यांशी सायकलिंग मोहिमेतून संवाद साधला आहे. त्यांनी भारतातील १२ राज्ये (महाराष्ट्र, गुजरात, गोवा, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू) आणि ४ देशांमध्ये (इंग्लंड, स्कॉटलंड, जर्मनी, फ्रान्स) अशा प्रकारच्या मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.