विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार : मुख्य सचिव राजेश कुमार

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार : मुख्य सचिव राजेश कुमार

मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचा सेवा गौरव

मुंबई, दि. ३०: महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून 2047 च्या विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या संकल्पनेच्या दिशेने सर्वांच्या सहकार्याने काम करणार असल्याचे राज्याचे 49 वे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी सांगितले.

शासनाने राज्याच्या मुख्य सचिवपदी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. यानंतर आयोजित कार्यक्रमात प्रशासकीय अधिकारी तसेच मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्यावतीने सौनिक यांचा तसेच वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त शाल, पुप्षगुच्छ, मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांचे शाल, पुप्षगुच्छ, देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी माजी मुख्य सचिव मनोज सौनिक, राजेश कुमार यांच्या पत्नी अर्चना राजेश कुमार आदी यावेळी उपस्थित होते.

मुख्य सचिव राजेश कुमार म्हणाले, आपल्या मुख्य सचिवपदाच्या कालावधीत सर्व विभागांच्या सचिवांच्या सहकार्याने सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडविण्यासाठी प्रयत्न करण्याला प्राधान्य दिले जाईल. लोकांची कामे त्या-त्या ठिकाणीच व्हावीत, त्यांना मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासू नये यासाठी राज्य शासनाच्या सर्व विभागांच्या योजनांना अधिक गती देण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्व क्षेत्रांमध्ये प्रगत असलेल्या महाराष्ट्राला अधिक उत्कृष्ट आणि नाविन्यपूर्ण कामाच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

शासन ही लोकसेवा करण्याची संधी – सुजाता सौनिक

मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी यावेळी महाराष्ट्रासारखे दुसरे राज्य नाही, महाराष्ट्र हा एक विचार असून हा विचार कर्तृत्वाचा आणि नवचैतन्याचा असल्याचे सांगितले. सौनिक म्हणाल्या, अशा राज्यात शासन ही सत्ता नसून येथे नेतृत्व करायला मिळणे म्हणजे परिणाम घडविण्याची, लोकसेवा करण्याची संधी आहे. राज्य शासनाने मला ही सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि या ऋणाची परतफेड सेवेच्या नवीन स्वरुपात करत राहीन. लोकांच्या जीवनामध्ये बदल घडविण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्यातील जनतेचेही आभार मानले.

राजीव निवतकर यांनी सेवानिवृत्तीनिमित्त सत्काराला उत्तर देताना राज्य शासन आणि सर्व संबंधितांचे आभार मानले.

यावेळी अपर मुख्य सचिव व्ही.राधा, अपर मुख्य सचिव विकास खारगे, महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथील निवासी आयुक्त आर. विमला, प्रधान सचिव एकनाथ डवले, प्रधान सचिव राधिका रस्तोगी, अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, मुख्य सचिव कार्यालयातील अवर सचिव विठ्ठल भास्कर, माहिती आयुक्त प्रकाश इंदलकर, लीना संख्ये, अधिकारी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी श्री. काटकर, विनोद देसाई आदींनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.

०००

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!