माजी आमदार भांबळे यांचा दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश !
मोठ्या लवाजाम्यासह भांबळे मुंबईत दाखल, सायंकाळी पाच वाजताचा मुहूर्त
परभणी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर विधानसभा मतदारसंघात एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे हे आज मंगळवारी, १ जुलै रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सायंकाळी पाच वाजता भेट घेणार आहेत. यासाठी मोठ्या लवाजाम्यासह श्री.भांबळे हे मुंबईत दाखल झाले आहेत.अशी माहिती सूत्रांनी दिली. कदाचित आजच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते प्रवेश करणार आहेत, असे सांगितले जात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेता श्री. भांबळे यांचा हा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे. दरम्यान, सेलू जिंतूर तालुक्यातील आजी-माजी पंचायत समिती, जिप सदस्य, अनेक सरपंच, पदाधिकारी व कार्यकर्ते मुंबईत दाखल होत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून भांबळे यांच्या पक्षांतराबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. या चर्चेबद्दल भांबळे यांनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती, त्यामुळे त्यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाबद्दल तर्कवितर्क लावले जात होते. अखेर, ते लवकरच अजित पवार गटात सामील होतील हे स्पष्ट झाले होते आणि त्यांचे समर्थक कार्यकर्तेही याबद्दल दुजोरा देत होते.
गेल्या महिन्यात जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या पक्षप्रवेशासाठी उपमुख्यमंत्री पवार पाथरी येथे येणार होते, परंतु त्यांचा दौरा लांबणीवर पडल्याने दुर्राणी यांचा पक्षप्रवेशही रखडला. त्यानंतर दुर्राणी पाठोपाठ भांबळेही अजित पवार यांच्या दुसऱ्या दौऱ्यात जिंतूर येथे जोरदार शक्तिप्रदर्शन करत पक्षप्रवेश करतील अशीही चर्चा होती.
सोमवारपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यामुळे उपमुख्यमंत्री पवार यांचा किमान पंधरा दिवस परभणी जिल्ह्याचा दौरा होणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यामुळेच माजी आमदार भांबळे यांनी पक्षीय पातळीवरील वरिष्ठांशी चर्चा करून उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत मुंबईतच राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. यासंदर्भात माजी आमदार भांबळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही मुंबईतील पक्षप्रवेशास दुजोरा दिला आहे.