माजी आमदार भांबळे अखेर दादांच्या राष्ट्रवादीत
मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित समर्थकांसह प्रवेश
परभणी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील सेलू, जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे यांनी आपल्या समर्थकांसह मंगळवारी, १ जुलै रोजी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी माजी मंत्री नवाब मलिक, आमदार राजेश विटेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
भांबळे यांच्यासोबत प्रेक्षा भांबळे, मनिषा केंद्रे, राजेंद्र लहाने, रामराव उबाळे, अप्पासाहेब डख, शरद आकात, सुधाकर रोकडे, चंद्रकांत गाडेकर, पुरूषोत्तम पावडे, विश्वनाथ राठोड, अजयराव चौधरी, विनायक पावडे, प्रकाश मुळे, निर्मला लिपणे, शेख इस्माईल आदींसह पदाधिकारी, आजी माजी सरपंच, पंचायत समिती व जिप सदस्य, सोसायटीचे चेअरमन,बाजार समिती संचालकांनी प्रवेश केला आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विचारात घेता श्री. भांबळे यांचा हा प्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
भांबळे यांना २०१९ नंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या काही महिन्यांपासून भांबळे यांच्या पक्षांतराबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. अखेर मंगळवारी प्रवेशाचा मुहूर्त मुंबईत साधला गेला. श्री.भांबळे यांच्या प्रवेशामुळे सेलू, जिंतूर तालुक्यातील राजकीय समीकरणे पुन्हा नवी वळणे घेण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे. दरम्यान मागील दोन विधानसभा निवडणुकीत विद्यमान भाजप आमदार तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी भांबळे यांचा पराभव केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर यांनी सेलू, जिंतूरसह परभणी जिल्ह्यात वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थ्या निवडणुकांच्या या पार्श्वभूमीवर भांबळे यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशामुळे महायुतीतील समीकरणे कशी बदलतात, याकडे लक्ष लागले आहे.