हरितक्रांतीने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले

हरितक्रांतीने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले

विस्तार शिक्षण संचालक डॉ.राकेश आहिरे यांचे मत, परभणी येथील वनामकृवित ‘कृषी दिन’ उत्साहात

परभणी : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांची जयंती आणि कृषी दिनानिमित्त परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी, विद्यापीठातील कै. वसंतराव नाईक यांच्या स्मारकास शिक्षण संचालक डॉ.भगवान आसेवार आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

या वेळी बोलताना शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी नाईक यांच्या कार्ययोगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, “कै. वसंतराव नाईक यांनी आपल्या कार्यकाळात हरितक्रांतीला प्रोत्साहन देऊन महाराष्ट्रातील शेती आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले. त्यांनी सिंचन, खते आणि बियाण्यांचा प्रसार करून कृषी उत्पादनात लक्षणीय वाढ घडवून आणली. १९७२ मध्ये महाराष्ट्रात विभागनिहाय चार कृषी विद्यापीठांची स्थापना करून त्यांनी कृषी शिक्षणाला मोठी चालना दिली.”

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “कै. वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री होते. त्यांनी राज्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी अनेक दूरदृष्टीचे धोरणात्मक निर्णय घेतले. शेतकरी कल्याणकारी योजना, सहकारी संस्थांचा विकास तसेच कृषी आधारित उद्योगांना त्यांनी प्रोत्साहन दिले. विशेषतः ज्वारी पिकाच्या संशोधनावर त्यांचे विशेष लक्ष होते.”
या कार्यक्रमाला प्राचार्या डॉ. जया बंगाळे, प्राचार्य डॉ. राजेश क्षीरसागर, प्राचार्य डॉ. राहुल रामटेके, प्राचार्य डॉ. प्रवीण वैद्य, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेतील ‘रावे’ उपक्रमाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या निमित्ताने, राष्ट्रीय सेवा योजना, कृषी महाविद्यालय, परभणी यांच्या वतीने शिक्षण संचालक डॉ.भगवान आसेवार यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!