कोट्यवधींवर डल्ल्याचा ‘राजस्थानी’चाही डाव ? फौजदारी कारवाईची मागणी जोरात, सेलूतील ठेवीदारांतून तीव्र संताप
परभणी : बीड येथील सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटी पाठोपाठ अवघ्या सहा महिन्यातच परळी वैजनाथ येथील चंदुलाल बियाणी यांच्या राजस्थानी मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीने सेलूतील भोळ्याभाबड्या, गोरगरिब सामान्य जनतेच्या तसेच अनेक व्यापाऱ्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवींवर डल्ला मारण्याचा डाव टाकला आहे. असा आरोप ठेवीदारांकडून केला जात आहे. दरम्यान, गेल्या तीन महिन्यापासून अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्यासह संचालक मंडळासह पदाधिकारी, प्रमुख अधिकारी तसेच सेलूसह अनेक शाखाधिकारी यांचे मोबाईल नॉट रिचेबल आहेत. सेलू् शाखेचे कार्यालय बंद आहे. शाखेचे स्थानिक सल्लागार मंडळातील सदस्य मूग गिळून गप्प आहेत. यामुळे ठेवीदार, खातेदारांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.ठेवीदारांचे पैसे परत करावेत अन्यथा, फसवणूक प्रकरणी सर्व संबंधिता विरूद्ध फौजदारी कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.
२० ऑगस्ट २०२३ रोजी सेलूत राजस्थानी मल्टीस्टेट को-क्रेडिट सोसायटीच्या शाखेची दणक्यात सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी व गाजावाजा करून ठेवी व आकर्षक कर्जाबद्दल माहिती दिली. सेलू येथील प्रतिष्ठित नागरिकांना स्थानिक संचालक मंडळात घेतले. यामुळे अवघ्या तीन महिन्यांत सव्वा कोटी रुपयांपेक्षा अधिक ठेवी जमा झाल्या. परंतु २८ डिसेंबर २०२३ पासून दरमहा दहा हजारांच्यावर रक्कम ग्राहक, ठेवीदारांना देऊ नये, असे निर्देश सेलूच्या शाखाधिकारी यांना मुख्य शाखेकडून देण्यात आले. मात्र, चौकशी अंती ठेवीदारांचे पैसे देण्यास सोसायटी असमर्थ असल्याची तसेच सरकारकडून सोसायटीच्या व्यववहारावर टाच आणल्याची उलटसुलट चर्चा सुरू झाली.
♦तक्रारदारांना वाली मिळेना
या पार्श्वभूमीवर संतप्त ठेवीदारांनी १२ फेब्रुवारी रोजी बीडचे सामाजिक कार्यकर्ते प्रा.सचिन उबाळे यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीच्या सेलू शाखेसमोर तीव्र आंदोलन केले., ‘ज्ञानराधा’सह ‘राजस्थानी’च्या ठेवीदारांनी आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या सेलू् येथील निवासस्थानी जाऊन भेट घेत कैफियत मांडली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ठेवीदारांच्या ठेवी तातडीने परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बोर्डीकर यांनी सांगितले. या संदर्भात सेलू्तील काही ठेवीदारांनी भारत सरकराच्या को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या सहायक आयुक्तांकडे, सहकार आयुक्त, पोलिस ठाणे, उपविभागीय अधिकारी, आपले सरकार पोर्टलवर तक्रारी केल्या आहेत. मात्र तक्रारदारांना वाली मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. सोसायटीमध्ये कोट्यवधी रुपयांची अफरातफर झाल्याची चर्चा असतांना अध्यक्ष चंदुलाल बियाणी यांच्याकडून एकही अधिकृत दिलासादायक माहिती ग्राहक, ठेवीदारापर्यंत आली नाही. सोसायटीवाले संपर्कहीन झाल्याने कार्यावाही होत नाही यामुळे ठेवीदारांच्या चिंता अधिक वाढल्या आहेत.
♦फौजदारी कारवाईची मागणी
सोसायटीच्या स्थानिक सल्लागार मंडळामध्ये सेलू शहरातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, उद्योजक यांचा समावेश आहे. त्यांची नावे पाहून तसेच आकर्षक व्याज दराला भाळून राजस्थानी मल्टीस्टेट को-क्रेडिट सोसायटीमध्ये अनेकांनी गुंतवणूक केली. मुलांचे शिक्षण, वृद्धांचे आजारपण, मुलींचे लग्न यासाठी भविष्याची तरतुद तसेच ऐनवेळीच्या कामाला लवकर पैसे मिळतील म्हणून एक ते बारा महिने कालावधीसाठी जमा पुंजी ठेव म्हणून ठेवल्या. मात्र, सोसायटीचा कारभार चव्हाट्यावर आल्यामुळे सल्लागार मंडळातील सदस्य तसेच शाखा अधिकारी यांची मोठी कोंडी होऊन बदनामी सुरू झाली आहे. ठेवीचे पैसे परत मिळावे यासाठी ठेवीदारांचा जीव टांगणीला लागला आहे. याकडे सर्व संबंधितांनी वेळीच गांभीर्याने लक्ष देऊन ठेवीदारांचे पैसे परत करावेत अन्यथा, फसवणूक प्रकरणी सर्व संबंधिता विरूद्ध फौजदारी कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे.
बीड येथील सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधा मल्टिस्टेटकडे साडे चार हजार कोटी रुपयांच्या, तर राजस्थानी मल्टीस्टेटकडे ९०० कोटी रुपयांच्या गोरगरीब नागरिक, व्यापारी, छोटे मोठे व्यावसायिक, मध्यमवर्गीय, शेतकरी, ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या आहेत. मुलांचे शिक्षण, वृद्धांचे आजारपण, मुलींचे लग्न यासाठी भविष्याची तरतुद म्हणून ठेवीदारांनी ठेवी केल्या आहेत. ज्ञानराधामध्ये सेलूतील ठेवीदारांच्या ५७ कोटी, तर राजस्थानी मल्टिस्टेटमध्ये तीन महिन्यात ठेवीदारांचे दोन कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. परंतु अनेकांच्या तक्रारी, आंदोलनानंतरही अद्यापही एकाही ठेवीदाराला पैसे परत मिळाले नाहीत. यामुळे हजारो ठेवीदार चिंतेत पडले आहेत.
सेलू शाखेतील एजंट्सची रक्कम परत करण्यात आली आहे. सोसायटीत तीन महिन्यांत एक ते सव्वा कोटी रुपयांपेक्षा अधिक ठेवी जमा झाल्या. तीन महिन्यांपासून शाखा बंद आहे. कर्ज वसुली, स्थावर मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी मुख्य शाखेचे अध्यक्ष व संचालक मंडळ प्रयत्न करीत आहेत. पाच मार्चपर्यंत यावर मार्ग काढला जाईल, अशी माहिती वरिष्ठांकडून मिळाली आहे. – नंदकिशोर सोमाणी, शाखाधिकारी, राजस्थानी मल्टीस्टेट को-क्रेडिट सोसायटी, सेलू