Loksabha Election : स्वीप पथकांमार्फत मतदार जनजागृती; मतदानाचा टक्का वाढविण्यावर परभणीमध्ये भर
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये परभणी लोकसभा मतदारसंघात पुरुष ६५.५१ टक्के, स्त्री ६०.४८ टक्के असे एकूण ६३.१० टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदानाचा टक्का वाढून ७५ टक्के व्हावा, असा निवडणूक आयोगाचा मानस आहे. त्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आलेले आहेत. सर्व राजकीय पक्ष व नागरिकांनी लोकशाहीच्या महोत्सवात सक्रिय सहभाग नोंदवावा. – रघुनाथ गावडे, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, १७- परभणी लोकसभा
परभणी : मागील निवडणुकीच्या तुलनेत २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये परभणी लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी स्वीप पथकांमार्फत मतदार जनजागृती केली जात आहे. याद्वारे “२६ एप्रिलचा दिवस ठेवा ध्यानी, मतदान केल्याविना राहू नका कोणी “, “मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो” अशी साद मतदारांना घातली जात आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, मनपा आयुक्त तृप्ती सांडभोर, उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते, उपविभागीय अधिकारी दत्तु शेवाळे, विविध ठिकाणचे तहसीलदार, नायब तहसीलदार, शिक्षणविभागाच्या वतीने मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यासाठी ‘सुव्यवस्थित मतदार शिक्षण आणि मतदारांचा सहभाग-स्वीप (SVEEP)’ पथके स्थापन करण्यात आली आहेत. परभणी येथील स्वीप पथकातील कलावंत का.रा.चव्हाण, शाहीर शिवाजी कांबळे, सुधाकर गायकवाड, लक्ष्मण गारकर, गंगाधर परसोडे यांनी बुधवारी (२७ मार्च) परभणी तालुक्यातील नांदखेडा, सनपुरी, धारणगाव व करडगाव या गावात भेटी देऊन पथनाट्य, गीते, पोवाड्यांच्या माध्यमातून नवमतदार, प्रौढ मतदार, ८५ वर्षं वयांवरील वृध्द मतदारांमध्ये जनजागृती केली. २६ एप्रिल रोजी आठवणीने बुथवर जाऊन मतदानाचा मौलिक अधिकार बजावण्याचे आवाहन केले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदारदूत म्हणून घरातील, गावातील मतदारांना मतदान करण्यासाठी २६ एप्रिलचा संदेश आठवण करुन द्यावा, असे सांगितले जात आहे. या वेळी ‘मतदारराजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो’ हे साभिनय गीत का.रा.चव्हाण यांनी सादर केले. शाहिरी गीतातून शिवाजी कांबळे यांनी मतदारांना मतदानाचे महत्व पटवून देत, बुथवर जाऊन मतदान केले पाहिजे, असे आवाहन केले. वृद्ध मतदारांना प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सुविधेची माहिती देण्यात आली. या वेळी मतदार, नागरिकांची उपस्थिती होती.