सेलू मार्केट कमिटीचे कापूस खेरदी बीट पूर्ववत; आमदार बोर्डीकर यांच्या मध्यस्थीनंतर व्यापाऱ्यांचा बहिष्कार मागे
सेलू जि.परभणी : शेतकरी बांधवांचे हित हे सर्वप्रथम असून शेतकऱ्यांच्या मालाची आवक आणि व्यवहारमुळे बाजार समिती आणि व्यापार चालतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले पाहिजे, अशी भूमिका आमदार मेघना बोर्डीकर यांनी मांडली. त्यानंतर गेल्या पंचवीस दिवसापासून बंद असलेले कापूस खरेदी बीट तीन एप्रिलपासून पूर्ववत सुरू होणार असून व्यापाऱ्यांनी बहिष्कार मागे घेतला आहे.
सेलू तालुक्यातील शेतकरी वर्गाची होणारी हेळसांड तसेच व्यापारी वर्गात पसरलेली नाराजी आणि भीती दूर करण्यासाठी व सेलूतील बाजारपेठ आणि व्यापार सुरळीत करण्याच्या हेतूने आमदार मेघना बोर्डीकर यांनी मध्यस्थी करत सन्मानजनक पर्याय काढला. सेलू बाजारपेठ कापसासाठी प्रसिद्ध असून शहरातील कापूस व्यापार हा वाढला पाहिजे. तसेच शेतकरी, व्यापारी आणि बाजार समितीमध्ये तनाण न होता समन्वय वाढला पाहिजे, असे भूमिका व्यक्त केली .सेलू ही कापसाची मुख्य बाजारपेठ असून येथे मराठवाड्याच्या सर्व दूर भागातून कापूस विक्रीसाठी येत असतो. हे वैभव वादामुळे लोप पावत होते. याची दखल घेत आमदार बोर्डीकर यांनी पुढाकार घेऊन व्यापारी यांची बैठक घेतली. अडचणी विचारल्या. त्यांना विश्वास दिला व सन्मानजनक पर्याय काढला. यावर व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य तसेच सेलू इंडस्ट्रियल ओनर्स असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य यांनी सकारात्मक होकार दर्शवला. तीन एप्रिलपासून बीट पूर्ववत सुरू करण्यास होकार दिला. बैठकीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डॉ.संजय रोडगे, माऊली ताठे,अनिलराव पवार, अजय डासाळकर, केशवराव सोळुंके, भास्कर आबा पडघन ,रामेश्वर राठी, शैलेजी तोष्णीवाल उपस्थित होते. या बैठकीसाठी व्यापारी असोसिएशनचे प्रभूदयाल मंत्री,सुरेंद्र तोष्णीवाल, निर्मलभाई, आशिष बिनायके, अविनाश बिहाणी, ब्रिजगोपाल काबरा, नारायण शर्मा, नबाराम पवार, अमोल दायमा, सहाय्यक निबंधक तायडे, राठोड , मार्केट कमिटी सचिव राजीव वाघ आदींची उपस्थिती होती.