परभणी लोकसभा : प्रमुख उमेदवारांसह लोकप्रतिनिधींनी केले मतदान

परभणी लोकसभा : प्रमुख उमेदवारांसह लोकप्रतिनिधींनी केले मतदान

परभणी : परभणी लोकसभा निवडणुकीत लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पक्ष, अपक्ष उमेदवारांसह लोकप्रतिनिधी, विविध पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी (२६ एप्रिल) आपला मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, महायुतीचे उमेदवार रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचे परभणी लोकसभा मतदारसंघात मतदान नव्हते. महविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांनी परभणी येथील शारदा महाविद्यालयाच्या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा अधिकार बजावला. या वेळी नवमतदार असलेल्या त्यांच्या कन्येने पहिल्यांदाच मतदान केले. बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आलमगीर खान यांनी परभणी येथे तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनीही पत्नी ॲड.माधुरी क्षीरसागर यांच्यासह परभणीतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.‌ वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाब डख, माजी खासदार गणेशराव दुधगावकर यांनीही मतदान केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार डॉ.फौजिया खान यांनी पती तहसीन खान, मुलगा अली खान यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. जिंतूर- सेलू विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, माजी आमदार विजय भांबळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पाथरी येथे मतदान केले. आमदार डॉ.राहुल पाटील यांनी पत्नी डॉ.संप्रिया पाटील यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर यांनी विटा (ता.सोनपेठ) येथे जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

जिल्हाधिकारी गावडे यांनी बजावला मतदानाचा हक्क

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक‍ निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांनी परभणी येथील मराठवाडा हायस्कूल येथील दिव्यांग मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी श्री.गावडे यांनी मतदान केंद्रातील केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्याशी संवाद साधून मतदान प्रक्रियेबाबतची माहिती घेतली. तसेच मतदानासाठी आलेल्या मतदारांशी देखील त्यांनी संवाद साधत मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी मतदार संघातील विविध मतदान केंद्रावर युवा मतदारासह ज्येष्ठ मतदार आणि महिला मतदारांनी देखील उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!