दावे-प्रतिदाव्यांचा ‘सोशल’ धुमाकूळ
बाबासाहेब हेलसकर
परभणी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी परभणी लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी, २६ एप्रिलरोजी मतदान शांततेत पार पडले. मतदानानंतर प्राप्त आकडेवारीव्दारे लढतीतील प्रमुख उमेदवारांच्या समर्थकांकडून मांडलेल्या दावे-प्रतिदाव्यांचा सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ सुरू आहे. विशेषतः महाविकास आघाडीचे उमेदवार संजय (बंडू) जाधव व महायुतीचे उमेदवार महादेव जानकर या प्रमुख उमेदवारांना जातनिहाय मतदानासह ५० हजार ते दीड लाखांपर्यंत मताधिक्य दाखविले जात आहे. विशेष म्हणजे अन्य पक्ष, अपक्ष उमेदवार आणि ‘नोटा’लाही आकडेमोडीत न्याय दिला जात आहे.
परभणी लोकसभा निवडणुकीत एकूण ३४ उमेदवारांचे भवितव्य यंत्रबंद झाले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय जाधव आणि महायुतीचे उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यामधील तगड्या फाईटची चर्चा मतदानानंतरही गरम आहे. थोड्याफार फरकाने का होईना, ‘विजय आमचाच’, ‘शिट्टी’च वाजणार, ‘मशाल’च पेटणार, ‘हॅट्ट्रिक’ होणारच, असे दावे-प्रतिदावे समर्थक करीत आहेत. याशिवाय जातनिहाय मतदानाचे आकडे व मताधिक्य सोशल मीडियावर प्रसारित केले जात आहे. त्यावर साधक-बाधक आणि रंजक प्रतिक्रियादेखील येत आहे.
निवडणूक विभागाने यावेळी मतदान ७५ टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी जनजागृती मोहिम राबविली. मात्र, ती तितकीशी प्रभावी ठरली नाही. शिवाय उन्हाची तीव्रता आणि पोलचिट वाटपातील गोंधळ याचा फटकाही मतदानाला बसल्याची चर्चा आहे. २०१९ च्या निवडणुकीत मतदारसंघात ६३.१० टक्के मतदान झाले होते. यावेळी ते किंचित घसरून ६२.२६ टक्क्यांवर थांबले आहे. एकूण २१ लाख २३ हजार ५६ मतदारांपैकी १३ लाख २१ हजार ८६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ११ लाख ३ हजार ८९१ पुरूषांपैकी ७ लाख १७ हजार ६१७ (६५.०१ टक्के ), तर १० लाख १९ हजार १३२ महिला मतदारांपैकी ६ लाख ४ हजार २४७ (५९.२९ टक्के) मतदारांनी हक्क बजावला. अन्य ३३ पैकी चार मतदारांनी मतदान केले.
♦‘निर्णायक’ मतांवरच दारोमदार
परभणी लोकसभा मतदार संघात निवडणूक प्रचारादरम्यान आणि मतदानाच्या दिवशीही मराठा-ओबीसी मुद्दा ठळकपणे चर्चेत आला. याचसोबत ग्रामीणभागातील मोठी गावे तसेच शहरी भागातील मुस्लीम बहुल वस्त्यांमधील मतदार मोठ्या संख्येने मतदानाला बाहेर पडले. याचा फायदा महाविकास आघाडीचे जाधव यांना होईल अशी चर्चा सुरू आहे, तर ओबीसींसह अन्य मोठा वर्ग जानकरांच्या बाजूने गेल्याचे मानले जात आहे. परंतु, नेमका विजय कुणाचा, याविषयी सध्यातरी कोणीही ठामपणे बोलत नाहीत. दरम्यान, बदलेली सामाजिक व जातीय समीकरणे, विविध राजकीय खेळ्या तसेच बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आलमगीर खान, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाब डख, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार राजन क्षीरसागर यांच्यासह अन्य पक्ष, अपक्ष उमेदवारांमुळे होणारे मतविभाजन; तसेच सायलेंट ओटर आदी निर्णायक मतांवरच जाधवांच्या हॅट्ट्रिकची आणि जानकरांच्या विजयाची दारोमदार आहे.