दिवसाढवळ्या दुचाकी पळवून चोरटा फरार; सेलूतील साईबाबा बॅंक परिसरातील घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
शहरात भितीचे वातावरण, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
प्रतिनिधी,सेलू, दि.१० : सेलू शहरातील गजबजल्या रोडवर साईबाबा नागरी बँकच्या पाठीमागे व नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या निवास्थानासमोरून सकाळी १०.४० वाजता एक मोटार सायकल चोरी झाल्याची घटना आठ मे रोजी घडली आहे. दुचाकी चोरणारा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
साईबाबा बँकेतील कर्मचारी अविनाश जाधव यांची मोटार सायकल (क्रमांक एमएच १२ एफक्यू ९५३२) बँकेच्या परिसरात उभी करून ठेवली होती. एका व्यक्तीने बनावट चावीने सदर मोटार सायकल चालू करून नेत असताना काही जणांनी आरडाओरड केली. परंतु चोरटा सुसाट वेगाने गाडी घेऊन फरार झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. तुळजाभवानी पतसंस्थेमधून ग्राहकाचे पैसे पळवण्याचा प्रकार पाच-सहादिवसापूर्वीच घडला आहे. यापूर्वी रेल्वेस्टेशन परिसरातून अनेक मोटार सायकल चोरीस गेल्या आहेत. मात्र, अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. दुसरीकडे शहरात अवैध धंदे मोकाटपणे चालू आहेत. रात्रीतून अवैध वाळू तस्कर, दिवसा ऑनलाईन मटका, जुगार, सट्टा, क्रिकेट सट्टा जोरात आहे. शहरात दुचाकी व पैसे चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढत आहे. मात्र पोलिस प्रशासन शोध लावण्यात अपयशी ठरले आहे. यामुळे शहरात भितीचे वातावरण आहे. चोरीच्या घटनांचा शोध लावून चोरट्यांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा, अशी मागणी होत आहे.