दर्जेदार बियाणे, खते उपलब्ध करा; सेलू तालुका दबाव गटाची मागणी
सेलू : खरीप हंगामाच्या तयारीला शेतकरी लागले आहेत. संबंधित विभागाने दर्जेदार, प्रमाणित खते, बियाणे व औषधी शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी सेलू तालुका दबाव गटाने सोमवारी उपविभागीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे केली.
गेल्या काही वर्षांत कृषी विभागाच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यात अप्रमाणित बोगस खते, बियाणे आणि औषधी विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे. अगोदरच शेतीमालाच्या भावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या खते, बियाणांचा बाजारात कृत्रिम तुटवडा तत्काळ थांबवावा. यासाठी जिल्हा कृषी विभाग, तालुका कृषी विभागातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात देऊन शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात दर्जेदार खते, बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ॲड. श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ, इसाक पटेल, गणेश सोंळके, गुलाब पौळ, उद्धवराव सोळंके, ॲड. देवराव दळवे, राजेंद्र केवारे, ॲड.उमेश काष्टे आदींनी केली आहे.