परभणी लोकसभा : जनतेच्या निवडणुकीत परभणीचा बालेकिल्ला अभेद्य

परभणी लोकसभा : जनतेच्या निवडणुकीत परभणीचा बालेकिल्ला अभेद्य 

३२ जणांचे डिपॉझिट जप्त : राजकीय समीकरणे बदलणार, पण गढूळ सामाजिक वातावरण निवळून काढण्याचे मोठे आव्हान

बाबासाहेब हेलसकर

परभणी :  परभणी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव आणि महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्यामध्ये थेट लढत झाली. मायक्रो ओबीसी, दलितांसह मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगेची भूमिका, महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी शरदश्चंद्र पवार पक्ष, कॉंग्रेसच्या पुढार्‍यांची वज्रमूठ, सक्रियता, तर कधी नव्हे ती मुस्लीम समाजाने घेतलेली निर्णायकता. या सर्व पार्श्वभूमीवर मराठा-मुस्लीम फॅक्टर तसेच ओबीसी-मराठा मतांचे ध्रुवीकरण प्रभावी ठरले आणि जनतेने हाती घेतलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे संजय जाधव हे तिसर्‍यांदा परभणीचा बालेकिल्ला अभेद्य राखण्यामध्ये यशस्वी ठरले आहेत. असा निष्कर्ष निकालानंतर राजकीय व सामाजिक वर्तुळात मांडला जात आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणे बदणार असली तरी, गढूळ झालेले सामाजिक वातावरण स्वच्छ करण्याचे आणि निवळण्याचे मोठे आव्हान सर्वांसमोर आहे.

प्रचारादरम्यान सुरुवातीला परभणीच्या विकासाचा मुद्या चर्चेत आला. परंतु पुढे ‘स्थानिक विरुद्ध बाहेरचा’ हा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आणला गेला. त्यातच मराठा विरुद्ध ओबीसी असे जातीपातीचे प्रखर राजकारण, आरोप-प्रत्यारोप दोन्ही बाजूंनी अग्रस्थानी राहिले. यामध्ये परभणीतील मूलभूत विकासाचे मुद्दे कागदावरच राहून चर्चेतून सपशेल गायबच झाले. निव्वळ मतपेढी खेचून आणण्यासाठीच्या जातीय खेळ्या प्रकर्षाने चर्चेत राहिल्या. जानकरांनी ओबीसी प्राबल्य भागावर अधिक लक्ष केंद्रित केले. याद्वारे मांडलेले विजयाच्या आत्मविश्वासाचे गणित सोडविण्यात जानकरांची मोठी दमछाक झाली. पण अपेक्षित यश गाठता आले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड सभादेखील जातीय समीकरणांमध्ये फेल ठरली. हेच वास्तव निकालानंतर स्पष्टपणे मांडले जात आहे. शिवाय राज्यातील बदलेल्या राजकीय समीकरणांमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याविषयी मतदारांत सहानुभूती होतीच. याचा फायदा जाधव यांना झाला. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मुस्लिम समाजाचे अनपेक्षित मतदान जाधवांच्या पारड्यात गेले. एकूणच जाधव यांच्या विजयी हॅटट्रिकनंतर महाविकास आघाडीतील नेते व कार्यकर्त्यांचे परिश्रम फळाला आल्याचे स्पष्ट झाले आहे, तर महायुतीतील नेत्यांची जानकरांना कितपत साथ मिळाली. हा ज्याच्या त्याच्या संशोधनाचा विषय आहे. या सर्व पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक निकालानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार असली, तरी सर्वांनाच परभणीच्या विकासासोबतच गावागावांमध्ये सामाजिक वातावरण स्वच्छ कसे राहिल यासाठी पुढाकाराने प्रयत्न करावे लागणार आहेत. हे मात्र खरे.

वंचितसह अन्य पक्ष, अपक्षांचा मतांचा वाटा लक्षवेधी; पण डिपॉझिट झाले जप्त : २०२४ च्या निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांचा मतांचा वाटा निश्चितच वाढला आहे. २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राजेश विटेकर यांच्याविरुद्ध केवळ ४३.०२ टक्के मते जाधवांनी होता. यावेळी जाधवांचा वाट्याला ४५.१६ टक्के मते आली. तर प्रतिस्पर्धी महायुतीचे महादेव जानकर यांना ३५.०९ टक्के मते आहेत. वंचित बहुजन आघाडीचे पंजाब डख यांनी चांगली मजल मारली असली, तरी मागील निवडणुकीच्या तुलनेत ‘वंचित’ ची टक्केवारी ११.९७ वरून ७.३७ टक्क्यावर घसरली आहे, तर अन्य छोटे पक्ष अपक्षांनी १२.३७ टक्के इतकी लक्षवेधी मते घेतली आहेत. cमात्र, जाधव आणि जानकरांच्या लढतीत अन्य सर्वच ३२ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!