परभणी लोकसभा : गंगाखेडची जानकरांना साथ, पण जाधवांसाठी परभणीने घडविला इतिहास

परभणी लोकसभा : गंगाखेडची जानकरांना साथ, पण जाधवांसाठी परभणीने घडविला इतिहास

पाच विधानसभांमध्ये जाधव यांना मोठी आघाडी

बाबासाहेब हेलसकर

परभणी लोकसभेतील सहापैकी केवळ गंगाखेड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना मताधिक्य आहे. उर्वरित पाचही विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांना मतांची मोठी आघाडी आहे. अपेक्षेप्रमाणे गंगाखेडकरांची जानकरांना साथ मिळाली, पण जाधवांसाठी परभणीने मताधिक्याचा इतिहास घडविला आहे.
परभणी लोकसभेत परभणी, गंगाखेड, जिंतूर-सेलू, पाथरी आणि जालना जिल्ह्यातील परतूर-मंठा व घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यापैकी परतूर, जिंतूर मतदारसंघात अनुक्रमे भारतीय जनता पक्षाचे माजी मंत्री बबनराव लोणीकर व मेघना साकोरे-बोर्डीकर आमदार आहेत. तर, गंगाखेड मतदार संघात राष्ट्रीय समाज पक्षाचे डॉ.रत्नाकर गुट्टे प्रतिनिधित्व करतात‌. या तीनही क्षेत्रात महायुतीचा मोठा प्रभाव असल्याने महायुतीचे जानकर यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार नेते व पदाधिकाऱ्यांनी केला होता. ओबीसी प्राबल्य व रासपचा प्रभाव अधिक असल्याने गंगाखेडमधून आमदार गुट्टे व ओबीसी नेतेमंडळी यांच्या नेतृत्वाखाली चाळीस हजारावर मताधिक्य जानकरांना गृहित धरले जात होते. मात्र, केवळ ६ हजार ७११ मतांची आघाडी जानकर यांना मिळाली. उर्वरित पाचही विधानसभेतून जानकर मोठ्या मतांनी पिछाडीवर राहिले. जाधव यांना एकूण ६ लाख १ हजार ३४३ मते मिळाली. प्रतिस्पर्धी जानकर यांना ४ लाख ६७ हजार ३८२ मते मिळाली. १ लाख ३४ हजार ६१ मताधिक्याने जाधव विजयी झाले.

जानकरांना अपेक्षित मताधिक्य असलेल्या जिंतूर-सेलू विधानसभा क्षेत्रातही जाधव यांनी १२,६४५ इतके मताधिक्य घेत आश्चर्याचा धक्का दिला. या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदश्चंद्र पवार पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे व सर्वच शिवसेना व महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी घेतलेले परिश्रम जाधव यांच्यासाठी फायद्याचे ठरले. परतूर-मंठा मतदारसंघातून जाधव यांना २५,३४४, तर पाथरीतून २९,१७१ आणि राष्ट्रवादी शरदश्चंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री राजेश टोपे यांच्या घनसावंगी मतदार संघात ३०,२५८ एवढी मतांची आघाडी जाधव यांना मिळाली. एकूण ३४ उमेदवारामध्ये १३ प्रमुख पक्ष व छोट्या पक्षाचे उमेदवार होते. यापैकी वंचित बहुजन आघाडीचे पंजाब डख यांनी ९५ हजार ९६७ मते घेत ‘वंचितां’ ची मतपेढी चांगलीच काबीज केली. तब्बल २१ अपक्ष उमेदवारांनी घेतलेली १ लाख ९०८ मते लक्षवेधी ठरली, तर छोट्या पक्षासह अपक्षांची एकूण मते १,६४,७४२ इतकी आहेत. पोस्टल मतदारांनीही जानकरांपेक्षा झुकते माप जाधवांच्या पारड्यात टाकल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. जाधव यांना ४,४७२, तर जानकर यांना ३,५१८  पोस्टल मते मिळाली. जाधव यांनी ९५४ मतांची आघाडी घेतली.

परभणीत सर्वाधिक ४२,२०० मताधिक्य : गेल्या तीन साडेतीन दशकांपासून परभणी लोकसभा मतदारसंघात १९९८ चा अपवाद वगळता १९८९ पासून शिवसेना उमेदवार विजयी होत आला आहे. विधानसभेला शिवसेना उमेदवाराला विक्रमी मतदान असायचे. मात्र, लोकसभेत होमग्राऊंड परभणीमध्ये शिवसेना उमेदवार मतांमध्ये सातत्याने पिछाडीवर राहायचा. २०१९ च्या निवडणुकीत २९ हजारांवर मतांनी जाधव पिछाडीवर होते. या वेळी मुस्लिम व दलित दोन्ही घटकांनी जाधवांना निर्णायक पाठिंबा देत इतिहास घडविला. जाधव यांना सर्वाधिक ४२,४०० मतांची निर्णायक आघाडी मिळाली आहे.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!