जिंतूर बाजार समिती : चौदा सदस्यीय प्रशासक मंडळावर गुन्हा दाखल; 33 लाख 37 हजार 466 रुपयांचा अपहार
परभणी : जिंतूर येथील कृषि उत्पन्न बाजार समितीतील तत्कालीन अशासकीय प्रशासकीय मंडळाने अनेक बाबीत केलेल्या 33 लाख 37 हजार 466 रुपयांच्या अपहाराबद्दल 14 सदस्यीय प्रशासकीय मंडळाविरुध्द जिंतूर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये फसवणूकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. बाजार समितीचे विद्यमान सभापती गंगाधर बोर्डीकर यांनी जिंतूर पोलिस ठाणे गाठून महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियमचे कलम 29 अन्वये तक्रार केल्
जिंतूर बाजार समितीत 22 जानेवारी 2020 ते 20 एप्रिल 2022 या कालावधीत अशासकीय प्रशासकीय मंडळ कार्यरत होते. मनोज मुंजाभाऊ थिटे यांच्या अध्यक्षतेखालील या मंडळात शंकर गुलाब जाधव, रुपेश कांतराव चिद्रवार, जगदीश मुंजाजी शेंद्रे, प्रकाश माधवराव शेळके, दिलीप रामभाऊ डोईफोडे, दिलीप वाघोजी घनसावंत, प्रभाकर भिमराव चव्हाण, कैलास शंकरराव सांगळे, हनुमंत मसाराव भालेराव, मोहम्मद आबेद मोहम्मद गफार, अभियंता बोराडे, सतीश काळे व लोकपाल मंगेश शिंदे आदी समाविष्ट होते. या मंडळाने त्या कालावधीत प्लॉट वाटप, अविक्रीय माल, रस्ते, लाईट, बाग-बगीचा ईत्यादीच्या खर्चात, बांधकाम खर्च, गोदामामधील भंगार विक्री, स्वच्छता व दुरुस्ती, प्रवास खर्च व भोजन इत्यादींमध्ये स्वतःच्या फायद्या करीता बाजार समितीच्या निधीचा मुक्तपणे वापर केला, अपहारही केला. सदर रक्कमेतून स्वतःचे व कुटूंबियांच्या नावे मिळकती खरेदी केल्या. संपूर्ण कालावधीत अत्यंत अंदाधुंद पध्दतीने म्हणजे सर्व कायदे, नियम, अटी वगैरे खुंटीला टांगून खोटी कागदपत्रे, बनावट पावत्यांच्या आधारे या मंडळातील प्रत्येक सदस्याने बाजार समितीच्या निधीचा अपहार केला.
कृषि उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती गंगाधर वामनराव कदम बोर्डीकर यांनी 27 मे 2023 रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला. त्याद्वारे या मंडळाच्या सदस्यांनी केलेल्या गैर व्यवहाराची चौकशी करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. जिल्हा उपनिबंधकांनी 30 जून रोजी एका आदेशाद्वारे विशेष लेखा परिक्षक वर्ग-2 घ.अ. बैसठाकूर यांना त्या कालावधीतील लेखा परिक्षण करुन अहवाल सादर करण्याचा आदेश बजावला. त्यावरुन 5 जूलै 2023 रोजी जिल्हा उपनिबंधकांना विशेष अहवाल सादर करण्यात आला. या अहवालातील गंभीर दोषांबाबत वस्तूस्थितीची पडताळणी करीत जिल्हा उपनिबंधकांनी 11 ऑगस्ट 2023 रोजी संदीप तायडे यांच्या नेतृत्वाखाली त्रिस्तरीय चौकशी समिती स्थापन केली. संबंधित समितीने लेखा परीक्षण अहवालातील मुद्यांच्या आधारे तत्कालीन अशासकीय प्रशासकीय मंडळ, सचिव, सहाय्यक सचिव व रोखपाल यांचे लेखी खुलासे घेवून बाजार समितीस प्रत्यक्ष भेट देवून कागदपत्रांची पडताळणी केली व 7 डिसेंबर 2023 रोजी अहवाल सादर केला. सर्व संबंधितांना त्यांचे म्हणणे मांडण्याची वाजवी संधी देवून जिल्हा उपनिबंधकांनी तत्कालीन अशासकीय मुख्य प्रशासक व संबंधित अशासकीय सदस्य यांच्या विरुध्द खोटे व बनावट बिले, व्हावचर तयार करुन बाजार समितीच्या निधीचा अपहार केल्या प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश बजावले. या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे सभापती गंगाधर बोर्डीकर यांनी जिंतूर पोलिस ठाणे गाठून महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियमचे कलम 29 अन्वये तक्रार दाखल केली. जिंतूर पोलिसांनी त्या तक्रारीच्या आधारे 14 जणांविरोधात दखलपात्र गुन्हा क्रमांक 357/2024 कलम 420, 405, 408, 409, 464, 465, 466, 468, 471, 477 (अ) 120 (ब) 34 भादंवि अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.