कविता मिरगाच्या : वावरातल्या पिकाला, चांगला भाव मिळावा…सेलूतील काव्य मैफिलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठानचा उपक्रम
सेलू : येथील शब्दसह्याद्री, अक्षर प्रतिष्ठान आणि स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी, सात जून रोजी सायंकाळी आयोजित अकराव्या ‘कविता मिरगाच्या’ मैफिलीला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘मी लिहिलेल्या पुस्तकाला, एखादा नवा पुरस्कार मिळावा, या पेक्षा वावरातल्या पिकाला, चांगला भाव मिळावा ‘ शेतकऱ्यांची आंतरिक भावना सांगणारी कविता नाशिक येथील कवी संदीप जगताप यांनी सादर केली. अंबाजोगाई येथील कवी मुकुंद राजपंखे यांच्या ‘ लोक येतील धावून शब्दावरी, वागणे आपले चांगले पाहिजे, घर नव्याने पुन्हा बांधले पाहिजे, जळमटांना जुन्या जाळले पाहिजे ‘ या कवितेने रसिकांना भावनिक केले. परभणी येथील कवी कल्याण कदम यांच्या ‘ गेला तलाठी कोण्या गावा, संरपंचाचा नाही ठावा, ग्रामसेवक तरी दावा ‘ या कवितेतील वास्तव चित्रण मन हेलावून गेले. छत्रपती संभाजी नगर येथील कवी भास्कर निर्मळ यांनी ‘ तो पोखरत नाही कुठलाही डोंगर , झाडांच्या मुळांना इजा होईल म्हणून ‘ या कवितेतून झाडांचे महत्त्व सांगितले. कवयित्री मधुरा उमरीकर यांची ‘ काळजाच्या आकांताची घालमेल, शब्दांशिवाय सांगत होत्या नदीच्या खळखळाटाला, काल चार कविता नदीवर आल्या होत्या काळीज धुवायला’ ही कविता मंत्रमुग्ध करून गेली. सेलू येथील कवी अशोक पाठक यांनी ‘ तुझ्या रुपाचं चांदणं, कसं पडलया गं दारी, माझ्या जीवाचिया झाली, तशी घालमेल पोरी’ या प्रेम कवितेतून हळव्या नात्याची उकल केली. सूत्रसंचालन महेश अचिंतलवार यांनी केले. याप्रसंगी डॉ.सखाराम कदम, डॉ.शरद ठाकर, गंगाधर गायकवाड, प्रा.हनुमान व्हरगुळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, कवी डॉ.केशव खटींग, डॉ.गंगाधर गळगे, सुनील उबाळे, राजेश रेवले, प्राध्यापक प्रवीण पुरी, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने यांची उपस्थिती होती. प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ.सतीश मगर यांनी केले. रामराव गायकवाड, रामराव बोबडे, डॉ.काशिनाथ पल्लेवाड, सुभाष मोहकरे, चंद्रशेखर मुळावेकर, सुरेश हिवाळे महादेव आगजाळ, पंडित जगाडे, अनिरुद्ध टाके आदींसह रसिकांची उपस्थिती होती.