निसर्गप्रेमी वृक्षपालकांची सेलूमध्ये रविवारी बैठक; पावसाळ्यात राबविणार वृक्ष लागवड मोहीम
निसर्गप्रेमी नागरिकांची बैठक रविवारी, ९ जून रोजी सकाळी ११ वाजता बसस्थानकाजवळील कामगार कल्याण भवनाच्या फॉरेव्हर फिटनेस सेंटर, वरचा मजला येथे होत आहे.
सेलू : शहर व परिसरात वृक्ष लागवड आणि संवर्धन मोहीमेला गती देण्यासाठी पुढाकार घेणारे पर्यावरण स्नेही नागरिक आणि मोराया प्रतिष्ठानच्या पुढाकाराने वृक्ष लागवड व संगोपन करण्याचा उपक्रम यावर्षीच्या पावसाळ्यातही राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने निसर्गप्रेमी नागरिकांची बैठक रविवारी, ९ जून रोजी सकाळी ११ वाजता बसस्थानकाजवळील कामगार कल्याण भवनाच्या फॉरेव्हर फिटनेस सेंटर, वरचा मजला येथे होत आहे.
या बैठकीत पर्यावरण स्नेही वृक्ष लागवड व संवर्धन तथा वृक्ष पालक संकल्पनेविषयी विस्तृत चर्चा करणार आहेत. या पावसाळ्यात जास्तीत जास्त वृक्षांची लागवड व त्याचे संगोपन करण्याचा मानस आहे. सेलू शहरातील सर्व निसर्गप्रेमी नागरिक, सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था, महिला मंडळ, प्रशासन यांच्या पुढाकारातून सेलू शहर व परिसर पर्यावरणपूरक करण्यावर भर देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त वृक्ष पालकांनी बैठकीस आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन मोरया प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.