परभणीतील बाल विद्या विहार प्रशालेत योग दिन साजरा
परभणी: बाल विद्या विहार प्रशाला, अंबिका नगर परभणी येथे 21 जून शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांना योगविषयीचे महत्त्व व फायदे विशद करण्यात आले. संयुक्त राष्ट्र संघाने सन 2015 पासून जगभरात हा दिवस योग दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. दरवर्षी २१ जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे खास महत्त्व आहे. योगाच्या प्राचीन भारतीय पद्धती, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी त्याचे बहुआयामी फायदे याबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा केला जातो. दरवर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी एक विशेष थीम देखील असते.2024 मध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिनाची थीम ” स्वतःसाठी आणि समाजासाठी योग ” ही आहे.
सकाळी सात वाजता शाळेच्या प्रांगणात शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित झाले व योगशिक्षिका नेहा यादव यांच्या मार्गदर्शनाखाली अंकिता रेंगे, पल्लवी सदर,भक्ती लड्डा,गौरव लड्डा यांनी सर्वांना योगाभ्यास शिकवला. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी देखील आनंदाने शिकवलेले योग पूर्ण केले.नेहा मॅडम यांनी जमलेल्या सर्वांना योगाचे महत्त्व पटवून दिले व सतत योगा करण्यास प्रोत्साहन दिले. स्वाती कुलकर्णी यांनी नेहा यादव यांचे स्वागत केले.तर विजयश्री कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले.या कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याध्यापक विनायक लोखंडे आणि शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.