जिंतूरमध्ये कडकडीत बंद; सकल ओबीसी बांधव रस्त्यावर
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्टचे पडसाद
परभणी : भारतीय जनता पार्टीच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याच्या निषेधार्थ सकल ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने सोमवारी, २४ जून रोजी रस्त्यावर उतरला. जिंतूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
जिंतूर तालुक्यातील पाचेगाव येथील एका तरुणाने भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान व्हायरल केले. त्यामुळे सकल ओबीसी समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आक्षेपार्ह पोस्टच्या निषेधार्थ ओबीसी समाजाच्या वतीने सोमवारी जिंतूर बंदची हाक देण्यात आली. त्यास प्रतिसाद देत सकाळी आठ वाजल्यापासून सर्व व्यापार्यांनी बाजारपेठा कडकडीत बंद ठेवून निषेध केला. दरम्यान, अविनाश मुंजाजी काळे यांच्या फिर्यादीवरून आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अभि शालीकराम तळेकर या अल्पवयीन मुलावर विविध कलमांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. सध्या जिंतूरमध्ये शांतता असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.