पहिल्याच पावसात पर्यायी पुलाची दाणादाण
सेलू तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला
सकाश प्रतिनिधी, सेलू : सेलू तालुक्यातील सावंगी (पीसी)गावाला जोडणाऱ्या करपरा नदीवर सुमारे दोन कोटी रुपये खर्चाच्या पूल
पुलाचे बांधकाम सुरू आहे. यासाठी तयार करण्यात आलेल्या पर्यायी पूल व रस्ते काम निकृष्ट दर्जाचे झाले. यामुळे मंगळवारी, ९ जुलै रोजी मुसळधार बरलेल्या पहिल्याच पावसात पर्यायी पुलाची दाणादाण उडाली. बांधकामासह पूरात पूल वाहून गेला आहे. त्यामुळे सेलू तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला आहे.
मुसळधार पावसामुळे सावंगीजवळील करपरा नदीला पूर येतो. त्यामुळे गावाला जोडणारा रस्ता पुलाअभावी पाण्याखाली जात होता. ग्रामस्थांसह, शेतकरी, नागरीक, विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. तर पावसाळ्यात प्रत्येक नागरीकांना बँक, बाजार व इतर व्यवसायाकरीता तालुक्याच्या ठिकाणी जावे लागते. मात्र पावसाळ्यात या गावाचा आसपासच्या गावांसह सेलू शहराशी संपर्क तुटतो. करपरा नदीवरील पुलाची अनेक वर्षाची मागणी पूर्ण झाली. २०१८ मध्ये पुलासाठी १ कोटी ९७ लाख रूपयांचा निधी मंजूर करून देण्यात आला. आणि आता कुठे दोन महिन्यांपूर्वी मुख्यपुलाचे काम सुरूच झाले होते. त्यासाठी पर्यायी पूल व रस्ता संबंधित कंत्राटदाराने तयार केला होता. त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ओरड सुरू झाली. परंतु कंत्राटदारासह बांधकाम अधिकार्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले. अखेर मंगळवारी झालेल्या पहिल्याच पावसात निकृष्ट कामाचे पितळ उघडे पडले. आणि पर्यायी पूल व रस्ता वाहून गेला.याप्रकरणी कंत्राटदारांसह बांधकाम अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी आता सावंगीचे (पीसी) ग्रामस्थ करीत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासूनचा करपरा नदीवरील पुलाचा प्रश्न मार्गी लागला. मे महिन्यात कामाला सुरुवात झाली. परंतु कामाची गती अतिशय संथ आहे. पर्यायी पूल व रस्ता निकृष्ट दर्जाचा झाल्याने पहिल्याच पावसात वाहून गेला. यामुळे खैरी, निरवाडी बुद्रुक, निरवाडी खुर्द व सावंगी या चार गावांचा सेलू शहराशी संपर्क तुटला आहे. मुख्यपुलाचे काम दर्जेदार व गतीने करावे तसेच वाहून गेलेल्या पर्यायी पूल व रस्त्याचे काम तत्काळ हाती घ्यावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे. – तुकाराम ताठे, माजी सरपंच, सावंगी (पीसी)