मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण : परभणी जिल्ह्यात 19 हजार 530 महिलांचे अर्ज
परभणी : राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वकांक्षी योजनेसाठी परभणी जिल्ह्यात दिनांक 11 जुलै 2024 पर्यंत एकूण 19 हजार 530 एवढ्या लाभार्थी महिलांनी अर्ज भरले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांनी दिली आहे.
परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 1690 एवढ्या अंगणवाडी असून जिल्ह्यात 6 हजार 603 एवढ्या महिलांनी ऑनलाईन अर्ज भरले तर 12 हजार 927 एवढ्या महिलांनी ऑफलाईन अर्ज भरले आहेत. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त पात्र महिला लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांचे अर्ज भरण्याचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील एकूण 1690 अंगणवाडी सेविका व शहरीच्या एकूण 154 अंगणवाडी सेविकांच्या मोबाईलमध्ये नारीशक्ती दूत ऑनलाईन मोबाईल ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यात आले आहे. ज्यामध्ये ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतात. तसेच जिल्ह्यातील एकूण 3 लक्ष 62 हजार 302 एवढ्या कुटुंबाकडे केशरी आणि पिवळे रेशन कार्ड उपलब्ध आहेत.
तसेच सदर योजनेचे सनियंत्रण व माहितीसाठी तालुका निहाय विस्तार अधिकारी (सांख्यिकी) यांची नोडल अधिकारी म्हणून देखील नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र महिला लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून गावात दवंडी देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर वेळोवेळी कॅम्पचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच सर्व माध्यमांमधून या योजनेबाबत पात्र महिलांना माहिती देण्यात येत असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज महिलांना गावातच उपलब्ध करून देण्या बाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. तेव्हा महिलांनी आपले अर्ज आपल्या ग्रामपंचायतीत आणि आणि केंद्रावर भरावेत – रश्मी खांडेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी
मुख्यमंत्री -माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील जास्तीत जास्त महिलांनी आपले अर्ज भरावेत. यासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व प्रकारे मदत करण्यात येत आहे. -विशाल जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण