UPSC/Pooja Khedkar : लाखो युवा उमेदवारांच्या स्वप्नांचा चुराडा : प्रियंका गांधी; यूपीएससी अध्यक्ष मनोज सोनी यांचा राजीनामा
यूपीएससी’च्या परीक्षेसाठी विद्यार्थी किती मेहनत घेतात हे मी पाहिले आहे. अनेक स्वप्ने उराशी बाळगून ही मंडळी संघर्ष करत असतात. आता या सगळ्या परीक्षा प्रक्रियेमध्येच गैरप्रकार झाल्याचे वृत्त खरोखरच आश्चर्यजनक आहे. या परीक्षेतील एक साधी त्रुटी देखील सगळ्या प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करते. लाखो युवा उमेदवारांच्या स्वप्नांचा यामुळे चुराडा होतो, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी दिली आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्यावरील कारवाईचे प्रकरण चर्चेत असताना सनदी अधिकाऱ्यांची निवड करणारी संस्था केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) अध्यक्ष मनोज सोनी यांनी शुक्रवारी(१९ जुलै) राजीनामा दिल्याचे उघड झाले आहे. या पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ शिल्लक असताना त्यांनी हा राजीनामा दिल्याने अनेक तर्कविर्तकांसह चर्चेला उधाण आले आहे.
आंतरराष्ट्रीय संबंध आणि राज्यशास्त्राचे जाणकार असलेले मनोज सोनी २८ जून २०१७ ला लोकसेवा आयोगाचे सदस्य झाले होते. त्यानंतर १६ मे २०२३ ला त्यांनी आयोगाच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली होती. ‘यूपीएससी’च्या अध्यक्षपदाचा मनोज सोनी यांचा कार्यकाळ २०२९ पर्यंत होता. हा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे वेगवेगळे कयास लढविले जात आहेत. ‘सोनी यांनी हा राजीनामा आठवडाभरापूर्वी दिला होता आणि त्यामागे व्यक्तिगत कारण होते अद्याप राजीनामा मंजूर झालेला नाही,’ असे ‘यूपीएससी’कडून सांगण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज सोनी हे ‘यूपीएससी’चे अध्यक्ष बनण्यासाठी फारसे इच्छुक नव्हते आणि या जबाबदारीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी विनंतीही केली होती. मात्र त्यांची विनंती मान्य झाली नव्हती. सामाजिक आणि धार्मिक कार्यासाठी अधिक वेळ देण्यासाठी हा राजीनामा दिल्याचे कारण त्यांनी सांगितले जात आहे. दरम्यान, वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांच्याविरुद्ध ‘यूपीएससी’ने कारवाई सुरू केल्याचे काल जाहीर केले होते. त्यामध्ये बनावट दस्तावेजांच्या आधारे परीक्षा दिल्याच्या मुद्द्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच त्यांची नियुक्ती रद्द का केली जाऊ नये? यासाठीची कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.
ही व्यवस्थेची फसवणूक : केंद्रीय लोकसेवा आयोगातील अनेक गैरव्यवहार हा राष्ट्रीय चिंतेचा विषय बनला आहे. पंतप्रधान मोदी आणि कार्मिक, जनतक्रारी आणि निवृत्तिवेतन खात्याच्या मंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे. अपात्र उमेदवारांचे बनावट जात आणि वैद्यकीय प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत आला आहे. यात पूर्ण व्यवस्थेचीच फसवणूक झाल्याचे दिसून येते,’’ असे प्रतिपादन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले आहे. या परीक्षेची प्रामाणिकपणे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा अवमान आहे. ही मंडळी रात्र रात्र जागून परीक्षेची तयारी करत असतात. ‘यूपीएससी’च्या अध्यक्षांनी मुदत संपण्याआधीच राजीनामा का दिला? त्यांचा राजीनामा महिनाभर गोपनीय का ठेवण्यात आला? आता उघड झालेले गैरव्यवहार आणि या राजीनाम्याचा काही संबंध आहे का? सोनी यांना मोदींनीच गुजरातमधून आणले आहेत पुढे त्यांना पदोन्नती देऊन ‘यूपीएससी’चे अध्यक्ष बनविण्यात आले,’’ असा आरोप खर्गे यांनी केला.
credit / वृत्तसंस्था