ज्ञानराधा मल्टीस्टेट : १८ जणांवर परभणीत गुन्हे दाखल

ज्ञानराधा मल्टीस्टेट : १८ जणांवर परभणीत गुन्हे दाखल

गुंतवणुकदारांची दोन कोटी ६६ लाख ८३ हजारांची फसवणूक

आमदार डॉ.राहुल पाटील यांनी घेतली पोलिस अधीक्षकांची भेट, आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्याचे आवाहन

परभणी : बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट को.ऑप. क्रेडिट सोसायटीच्या परभणी येथील शाखेत गुंतवणुकदारांची जवळपास दोन कोटी ६६ लाख ८३ हजार ६५ रुपयांची फसवणूक झाल्या प्रकरणी ज्ञानराधा मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेश कुटे यांच्यासह एकूण १८ जणांविरुद्ध शनिवारी (२० जुलै) परभणीतील कोतवाली पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला.

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक नागोराव मुंजाजी गलांडे यांनी‌ फिर्याद दिली आहे. ज्ञानराधा परभणीचे शाखाधिकारी चेअरमन, संचालक मंडळ यांनी खातेदार व गुंतवणुकदार यांना वार्षिक १२ ते १३ टक्के व्याजदर देण्याचे आमिष देऊन गुंतवणूक केलेली रक्कम अद्यापपर्यंत परत दिली नाही. याप्रकरणी अन्यायाने विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी शाखाधिकारी महेश परदेशी, धनंजय गोंडे, लिपिक विलास वरकड लिपिक, एरिया मॅनेजर गणेश पिंपरकर, अध्यक्ष सुरेश कुटे, संचालिका अर्चना कुटे, उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी, वसंत सटाळे, आशिष पातूरकर, दादाराव उंदरे, वैभव कुलकर्णी, कैलास मोहिते, शिवाजी पारसकर, रवींद्र तलबे, आशा पाटील, रेखा सटाळे, रघुनाथ स्वरसाडे, रवींद्र यादव यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.

आमदार डॉ.पाटील यांचा पुढाकार

बीडच्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या आमिषाला बळी पडून राज्यभरात लाखो लोकांनी गुंतवणूक केली होती, परंतु लोकांना परतावा मिळाला नाही. हा मुद्दा परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी विधानसभा अधिवेशनात उपस्थित केला होता. शनिवारी (ता.२०) डॉ. पाटील यांनी पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांची भेट घेऊन सर्व संबंधितांवर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. ज्ञानराधा मल्टिस्टेटमध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांना परतावा मिळाला नाही. ज्ञानराधाच्या सर्व शाखा बंद झाल्या आहेत. संचालक सुरेश कुटे, अर्चना कुटे याच्यावर ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु, अजूनही लोकांच्या ठेवी परत मिळाल्या नाहीत. तसेच कुठलीही कठोर कारवाई होत नसल्याने ठेवीदार तणावात आहेत. त्यामुळे तात्काळ संचालक कुटे याच्यावर कठोर कारवाई करून ठेवीदारांचे पैसे परत मिळण्यासाठी कारवाई करावी, अशी मागणी आमदार डॉ..पाटील यांनी विधानसभा अधिवेशनात केली होती. तब्बल सहा लाख लोकांची चार हजार कोटी रुपये सुरेश कुटे याने कुठे नेऊन ठेवले, कोणत्या देशात ठेवले, याचा शोध घ्यावा तसेच कोणत्या राजकीय नेत्यांना पैसे पुरवले याची देखील चौकशी करावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली होती. सुरेश कुटे भाजपात जाताच त्याला अभय कसे मिळाले हा देखील प्रश्न आमदार पाटील यांनी उपस्थित केला होता.

आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्याचे आवाहन : कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हा शाखेकडे आपली तक्रार अर्ज स्वरूपात सादर करावी. कोणाचीही फसवणूक झाली असल्यास त्याबाबत तक्रार दिल्यानंतर त्याची शहानिशा केली जाईल. यासाठी गुंतवणूकदारांनी संपर्क साधावा, असे आवाहन आर्थिक गुन्हा शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शिवराज जमदडे यांनी केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!