पाथरीतील शिक्षकांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित
शिक्षणमंत्र्यांचे आश्वासन; विविध संघटनांचा सहभाग
परभणी : सरकारच्या घोषणेनंतरही अंशतः अनुदानित शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विनाअट अनुदानाचा पुढील टप्पा लागू न झाल्याने शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली पाथरी तहसील कार्यालयासमोर सात दिवसांपासून तीन शिक्षकांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. रविवारी, २८ जुलै रोजी शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांच्या माध्यमातून शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दूरध्वनीवरून आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
विविध मागण्यांसाठी समन्वय संघाचे प्रा.दीपक कुलकर्णी, ज्ञानेश चव्हाण, प्रा.रविकांत जोजारे यांनी २२ जुलैपासून तहसीलसमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना महसूल, पोलिस प्रशासनाने उपचार घेण्याची विनंती केली. परंतु, आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने सातव्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. या आंदोलनात मराठवाडा विभागातून एक हजाराहून अधिक शिक्षकांनी उपस्थित राहून सक्रिय सहभाग घेतला. दरम्यान, रविवारी शिक्षणमंत्री केसरकर यांनी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले की, सरकारने टप्पा अनुदान ११०० कोटी रुपये दिले आहे. अधिवेशनात घोषणा केली. कॅबिनेटने मंजुरी दिली, प्रस्ताव तयार झाला असून वित्त विभागाकडून माहिती मागविली आहे. जून महिन्यापासून हे लागू होईल, असे सांगत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावेळी मुंजाजी भाले पाटील, दादासाहेब टेंगसे, चक्रधर उगले, अशोक गिराम, एकनाथ घाडगे आदी उपस्थित होते. उपोषणकर्त्यांना नारळ पाणी देऊन आंदोलन स्थगित केले.
विविध संघटनांचा सहभाग
पाथरी येथील शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनास शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, तालुकाप्रमुख मुंजाभाऊ कोल्हे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणार्थी शिक्षकांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी खासदार संजय जाधव यांच्याशी संपर्क साधून दिला. खासदार जाधव यांनी मोबाईलवरून उपोषणकर्त्या शिक्षकांशी चर्चा केली. शनिवारी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, डी.के.देवकते, डॉ.एस.बी.मलसटवाड यांनी सक्रिय सहभाग घेऊन आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन केले. रविवारी शिक्षण संस्था महामंडळाचे सरचिटणीस तथा माजी आमदार विजय गव्हाणे, राज्य समन्वयक रामकिशन रौंदळे, जिल्हाध्यक्ष संतोष धारासूरकर, कार्याध्यक्ष उदय देशमुख, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक नावंदर, उपाध्यक्ष सूर्यकांत हाके, सचिव बळवंतराव खळीकर, अॅड.सतीश बारहाते यांच्या स्वाक्षरीचे समर्थनपत्र आंदोलकांना देऊन चर्चा केली. परभणी जिल्हा रिपब्लिकन शिक्षक संघासह विविध संघटनांनीदेखील आंदोलनाला पाठिंबा दिला.