दुध भेसळविरोधी समितीची धडक तपासणी मोहीम
परभणी : महाराष्ट्र शासन कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास विभाग निर्देशीत केल्यानुसार परभणी जिल्हयामध्ये दुधातील भेसळ रोकण्यासाठी जिल्हास्तरीय समितीने धडक तपासणी मोहीम सुरू केली आहे. सोमवारी, २९ जुलै रोजी सकाळी पूर्णा तालुक्यातील हेरीटेज फुड्स लिमिटेड मौजे ताडकळस या दुध संकलन केंद्रास समितीच्या पथकाने अचानक भेट दिली. तेथील सुमारे ५१४० लिटर संकलित दुधातील काही नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून सदर नमुने शासकीय प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. ही कारवाई समितीचे अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी परभणी डॉ. प्रताप काळे यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी श्री.गिनगिने, अन्न सुरक्षा अधिकारी श्री.तम्मडवार, दुध संकलन पर्यवेक्षक श्री.गुंडरे व श्री. इचनर यांचे पथकाने केली आहे. आगामी सणासुदीचा कालावधी विचारात घेता, दुध व दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ होत असल्याची बाब नागरिकांचे निदर्शनास आल्यास टोल फ्री क्रमांक ७०२८९७५००१ व ९०४९५१८७११ या क्रमांकावर किंवा ddopbn12@gmail.com व additionalcollectorpbn@gmail.com या ईमेलआयडीवर त्या अनुषंगाने माहिती द्यावी, असे आवाहन समितीचे अध्यक्ष डॉ.प्रताप काळे यांनी केले आहे.