परभणीच्या मनपा आयुक्तांना निलंबित करा
आमदार डॉ.राहुल पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
परभणी : परभणी शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे, जागोजागी साचलेले कचर्याचे ढिगारे यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या संदर्भात नगरसेवक, नागरिक, लोकप्रतिनिधी यांनी निवेदने देवून सुध्दा मनपा आयुक्तांनी कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत असून ते तीव्र आंदोलनाच्या तयारीत आहेत. त्यामुळे परभणी महापालिकेतील आयुक्त तृप्ती सांडभोर यांचे निलंबन करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी मंगळवारी (३० जुलै) परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली आहे. डॉ.पाटील यांनी परभणी शहरातील विविध मुलभूत प्रश्न मुख्यमंत्री शिंदे यांचा निदर्शनास आणून देत लक्ष वेधले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. परभणी महापालिकेवर प्रशासक तथा आयुक्त म्हणून श्रीमती सांडभोर यांची नियुक्ती झाल्यापासून सातत्याने शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कर्मचार्यांचा वेतनाचा प्रश्न प्रलंबित राहिल्याने सातत्याने कर्मचारी संपावर जात आहेत. त्यासोबतच अनेकवेळा वीज बिल भरले नसल्यामुळे पाणी पुरवठा खंडीत होत आहे. काही दिवसापूर्वी सफाई कामगार व घंटागाडी चालकांनी वेतनासाठी संप पुकारला होता. त्यामुळे पंधरा दिवस घंटागाड्या बंद राहिल्याने शहरात ठिकठिकाणी कचर्याचे ढिगारे साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरातील पथदिवे बंद असल्याने गुन्हेगारी घटना घडत असताना मनपा आयुक्त बघ्याची भूमिका घेत आहेत. दर महिन्याला कोट्यवधी रुपयांची कर वसुली होते परंतु एकही काम केल्या जात नसल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे, असे डॉ.पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.
♦महिला आघाडीचे जोडेमारो आंदोलन
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने मंगळवारी महापालिका आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या प्रतिमेस जोडे मारून त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी करीत आंदोलन करण्यात आले. आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंबिका अनिल डहाळे यांच्या नेतृत्वात हे झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील खड्ड्यात कच टाकून खड्डे बुजविण्यात आले.