अभिमानास्पद : ‘ विकास ‘ च्या जिद्दीला कौतुकाची थाप

अभिमानास्पद : ‘ विकास ‘ च्या जिद्दीला कौतुकाची थाप

पोलिस दलात निवडीबद्दल आमदार बोर्डीकर यांच्याकडून सत्कार

सेलू : ऐन तारुण्यात पाहिलेल्या स्वप्नांना साकार करण्यासाठी अंगमेहनत घेवून जिद्दीने साकार केलेल्या तरूणाच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी स्थानिक आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर सरसावल्या. त्यामुळे ‘विकास’ च्या जिद्दीला शाबासकीची थाप मिळाली आहे. सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील जिद्दी, मेहनती युवक विकास भिवा गवारे याची परभणी पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे स्थानिक आमदार मेघना बोर्डीकर यांनी त्याची भेट घेतली. त्याला पेढे भरवले आणि त्याचा यथोचित सत्कार केला. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. गुगळी धामणगाव सारख्या छोट्याशा खेड्यात राहून ‘खाकी वर्दीचे’ स्वप्न साकार करणारा ‘विकास’ हा मातंग समाजातला युवक आहे. अठरा विश्व दारिद्रय आणि गरीबीला पराभूत करण्यासाठी त्याने घेतलेली मेहनत कौतुकास्पद आहे. अंगावर वर्दी घालणारा ‘विकास’ हा कुटुंबाच्या पाच पिढ्यातला पहिलाच युवक आहे. त्यामुळे त्याच्या आई-वडीलांना लेकराच्या यशाचा अभिमान वाटतोय, असे आमदार मेघना बोर्डीकर यांनी सांगितले.

अंगी जिद्द व चिकाटी असेल तर कोणतेही लक्ष्य प्राप्त करता येते. असेच काहीसे ‘विकास’ने सिद्ध करून दाखवले आहे. ग्रामीण भागातील या तरूणाने प्रयत्नांची पराकाष्ठा करून यशाला गवसणी घातली आहे. जिद्द व चिकाटीने अभ्यास करून आपले शिक्षण पूर्ण केले. आता तो पोलीस दलात दाखल झाला आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तो सज्ज होत आहे, याचा आनंद वाटतो, असेही गौरवोद्गार आमदार मेघना बोर्डीकर यांनी काढले. दरम्यान, विकास गवारे या तरूणाने पहाटे उठून व्यायाम, दुपारी हाती पडेल ते काम आणि रात्री कठोर अभ्यास करून यश मिळवले असल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!