Naag Panchami : श्री विठोजी बिरोजींच्या दर्शनासाठी गर्दी; डिग्रस येथील वार्षिक यात्रोत्सव
५० हजारावर भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज, ३० क्विंटल खिचडी प्रसादाचे नियोजन
सेलू जि.परभणी : सेलूतील तालुक्यातील डिग्रस जहांगीर येथील श्री विठोजी बिरोजी मंदिरात शुक्रवारी (९ ऑगस्ट) नागपंचमी उत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला जात आहे. दर्शनासाठी पंचक्रोशीतील शेकडो भाविकांनी सकाळी सात वाजल्यापासून गर्दी केली आहे. मंदिर परिसरातील माती (वावरी) घरी घेऊन जाण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे. ही वावरी घरात ठेवल्याने साप येत नाहीत, अशी अख्यायिका आहे; तसेच वजनी दगडी गोल गोटे उचलण्याची परंपरा भाविकांनी जपली आहे. छोटेखानी यात्रेमध्ये प्रसाद व खेळणीची दुकाने मोठ्या प्रमाणावर थाटण्यात आल्याचे दिसून आले. प्रसादसाठीच्या मोठ्या प्रमाणावर नारळ विक्रेते आले आहेत. ५० हजारावर भाविक दर्शनासाठी येतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिस्तबद्ध दर्शनासाठी गावातील दीडशेहुन अधिक तरूण व ग्रामस्थ स्वयंसेवक म्हणून सेवा देत आहेत. नागपंचमी तसेच मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. उत्सवानिमित्त येणाऱ्या भाविकांना खिचडीचा प्रसाद दिला जात आहे. जवळपास ३० क्विंटलच्या प्रसादाचे नियोजन ग्रामस्थांनी केले आहे. ठिकठिकाणी चहापान तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेनिमित्त शांतता राखण्यासाठी सेलू पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे.