लिंक लाईनचे काम तत्काळ करण्याची मागणी
हिंगोली : महावितरणकडून लिंक लाईन कामात दिरंगाई होत असल्याने संतप्त झालेल्या, सेनगाव तालुक्यातील खैरखेडा ग्रामस्थांनी, मंगळवारी (२६ एप्रिल) सेनगाव – रिसोड महामार्गावर जोरदार घोषणाबाजीत रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात सकाळी अकरा वाजता आंदोलन सुरू झाले. पान कन्हेरगांव येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रांतर्गत, खैरखेडा लिंक लाईन कामाला मंजुरी मिळालेली आहे. परंतु कंत्राटदार व महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून कामामध्ये अक्षम्य दिरंगाई होत आहे. काम तातडीने पूर्ण करावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला होता. मात्र, काहीही कार्यवाही झाली नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. पोलीस निरीक्षक रणजित भोईटे व कर्मचाऱ्यांनी आंदोलन स्थळी धाव घेतली. महावितरणचे अधिकारी लोखंडे, घुगे, डोईफोडे यांनी आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून, लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. अमोल मोरे, सचिन मोरे, खनपटे, सुभाष मोरे, किसन मोरे, देवराव मोरे, प्रकाश मोरे, दत्तराव खरात, भीमराव मोरे, रामदास मोरे, मोतीराम मोरे, भागवत मोरे, रामेश्वर मोरे, संतोष मोरे, सुनील नवघरे, पिंटू खिल्लारी, शालिग्राम मोरे, विश्वंभर वाठोरे, देवीदास मोरे, ज्ञानेश्वर ढोरे, पिंटू ढोरे, संतोष खनपटे, हनुमान खनपटे, दीपक मोरे, मधुकर खिल्लारे, दशरथ मोरे, लक्ष्मण मोरे आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर : शिवशंकर निरगुडे, हिंगोली)