माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या विरोधात पाथरीत गुन्हा

माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या विरोधात पाथरीत गुन्हा

मृताच्या चिठ्ठीतून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप

परभणी : पाथरी शहरातील इंदिरानगर भागातल्या एका वृध्दाने शेतामध्ये विषारी द्रव्य प्राशन केल्याची घटना मंगळवारी, १३ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. मृताच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीवरून माजी आमदार बाबाजानी दुर्राणी आणि अन्य एकाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा; तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा पाथरी पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
मृताचा मुलगा अजयसिंह पाथरीकर यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचे वडील बाळकृष्ण शंकरराव कांबळे हे १२ ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास शेतात गेले होते. परंतू ते रात्री घरी परतले नाहीत. पाथरीनजीकच्या माळीवाडा शिवारात १३ ऑगस्टला सकाळी शेतात ते मृतावस्थेत आढळले. पोलिसांनी प्रेत रुग्णवाहिकेतून पाथरी येथील सरकारी दवाखान्यात विच्छेदनासाठी नेले. तेथे पंचनामा करीत असताना मयताच्या अंगावरील पँटच्या खिशात एक चिठ्ठी आढळली. त्या चिठ्ठीत नमूद केले की, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी प्लॉट व शेतीच्या व्यवहारावरून दिलेला त्रास तसेच शेतशेजारी विजय प्रभाकर वाकडे (रा.भीमनगर, पाथरी) यांनी दिलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचे पाऊल उचलले, असा आरोप करण्यात आला आहे. यावरून पाथरी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

राजकीय षड्यंत्रातून तक्रार : दुर्राणी

मृत बाळकृष्ण हा माझा कार्यकर्ता होता. त्यांचा मुलगा राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक होता. वर्षभरापूर्वी त्याने शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. तेव्हापासूनच तो शिंदे गटाच्या संपर्कात आहे. त्यामुळे कुणीतरी त्याला हाताशी धरून माझ्याविरुद्ध राजकीय षड्यंत्रातून ही तक्रार केली आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी माध्यमाशी बोलतांना दिली आहे.‌

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!