राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष : शिवस्वराज्य यात्रेचे जिल्ह्यात आगमन
परभणी, गंगाखेड, मानवत, सेलू, पाथरी, जिंतूर शहरात जाणार यात्रा
परभणी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेचे परभणी जिल्ह्यात आज शुक्रवारी सायंकाळी आगमन होणार आहे. शनिवारी, १७ ऑगस्ट रोजी परभणी शहरात शिवस्वराज्य यात्रेचे जोरदार स्वागत झाल्यांनतर मानवत, पाथरी, सेलू, जिंतूर येथे ही यात्रा जाणार आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी शुक्रवारी, १६ ऑगस्ट रोजी दुपारी शहरातील महात्मा फुले विद्यालयाच्या सभागृहात पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार अॅड.विजयराव गव्हाणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार डॉ.फौजिया खान, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मनिषा केंद्रे, प्रदेश सचिव तुपसमिंदर, गंगाधर यादव, रमाकांत कुलकर्णी यांची उपस्थिती होती. ही यात्रा गंगाखेड येथील कापसे मंगल कार्यालयात शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता पोहोचणार असून रात्री उशिरा यात्रेचा परभणी शहरात मुक्काम राहणार आहे. शनिवारी, १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रवादी भवन, वसमत रोड, परभणी येथे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार डॉ.अमोल कोल्हे पत्रकारांशी वार्तालाप करणार आहेत. यानंतर या यात्रेला प्रारंभ होणार असून शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत. यानंतर ही यात्रा मानवत मार्गेे पाथरी येथे जिल्हा परिषद मैदानावर दुपारी १२ वाजता पोहचणार आहे. त्याठिकाणी यात्रेचे स्वागत व सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर यात्रा सेलू मार्गे जिंतूर येथील जिल्हा परिषद मैदानावर दुपारी अडीच वाजता पोहोचणार आहे. तेथील कार्यक्रम आटोपल्यानंतर यात्रा सायंकाळी हिंगोली जिल्ह्यातील वसमतकडे रवाना होणार आहे,असे जिल्हाध्यक्ष अॅड.गव्हाणे यांनी सांगितले.