मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण : दोन लाखाहून अधिक बहिणींना मिळणार योजनेचा लाभ
जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे : एकही बहिण या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही
परभणी, दि.17 : राज्यात 01 जुलै, 2024 पासून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही राज्य शासनाची महत्वकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी महिलांचे 2 लाख 57 हजार 276 इतके अर्ज प्राप्त झाले असुन, त्यापैकी 2 लाख 47 हजार 332 अर्ज पात्र ठरले असून जिल्ह्यातील महिला लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करुन त्यांना या योजनेचा लाभ देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात श्री. गावडे हे बोलत होते. यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, मनपा आयुक्त धैर्यशील जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संगिता चव्हाण, प्रशासन अधिकारी श्री. जगताप, मनपाचे अतिरिक्त आयुक्त मिनीनाथ दंडवते आणि महिला व बाल विकास अधिकारी कैलास तिडके यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्री. गावडे म्हणाले की, राज्य शासनामार्फत सर्व सामान्य जनतेसाठी विविध महत्वकांक्षी योजना राबविण्यात येते आहे. या योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांच्या प्रतिक्रिया ऐकुण ही योजना किती चांगली आहे याची जाणीव होते. राज्यात 1 जुलैपासून ‘माझी लाडकी बहीण ही योजना’ सुरू करण्यात आली असून,
जिल्ह्यातील 2 लाखाहून अधिक महिला लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ प्राप्त होणार आहे. अनेक महिलांच्या खात्यात या योजनेची रक्कम जमा देखील करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांना प्रत्येक महिन्याला 1 हजार 500 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी अंगणवाडी सेविका, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी, महिला बाल कल्याण अधिकारी यांनी रात्रंदिवस काम करुन लाभार्थ्यांचे नाव नोंदणी करण्याचे काम केले. अंगणवाडी सेविका,मदतनीस आणि महिला बाल विकास विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कठोर मेहनतीमुळे हे मोठे काम शक्य झाले आहे. यासाठी मुख्य सचिव आणि महिला व बाल विकास विभागाचे सचिव यांनी दररोज ऑनलाईन बैठका घेवून या योजनेच्या कार्याचा आढावा घेतला. या योजनेतील दूसऱ्या टप्प्यात देखील अशा प्रकारचे सर्वांनी काम करावे असे सांगुन, जिल्ह्यातील एक ही बहिण या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची ग्वाही देखील श्री. गावडे यांनी यावेळी दिली.
या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. याकरीता अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट आहे. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या सर्व महिलांच्या खात्यात 17 ऑगस्ट पर्यंत लाभाच्या दोन हप्त्यांची रक्कम जमा होणार आहे. आजच्या कार्यक्रमात योजनेतील लाभार्थी महिलांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ वितरण करण्यात आला आहे. काही कागदपत्राअभावी ज्या महिला लाभार्थ्यांचे अर्ज अपात्र ठरले आहेत, त्यांची लवकरच पुर्तता करुन घेवून त्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचे श्री. गावडे यांनी यावेळी सांगितले.
या योजनेच्या लाभ वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम श्री शिवछत्रपती क्रिडा संकुल, बालेवाडी पुणे येथे आज माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. राज्यातील 15 हजाराहून अधिक लाभार्थी महिला कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमामध्ये प्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थींना रक्कम जमा केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देखील आपणांस येथे पहावयास मिळणार असल्याचे श्री. गावडे यांनी यावेळी सांगितले.
आमदार रत्नाकर गुट्टे यावेळी म्हणाले की, सर्व सामान्य जनतेसाठी ‘माझी लाडकी बहिण’ हा राज्य शासनाचा स्तुत्य कार्यक्रम आहे. जिल्ह्यातील माझ्या सर्व बहिणींनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. राज्य शासनाने जनतेसाठी अनेक कल्याणकारी निर्णय घेतले आहे. हे सर्व सामान्य जनतेचे सरकार आहे. या योजनेच्या लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ही योजना निरंतर सुरु राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी प्रास्ताविकात श्री. तिडके ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ची माहिती देतांना म्हणाले की, या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्ती ही महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे. वयाची किमान 21 वर्षे, तर कमाल 60 वर्षे पूर्ण होईपर्यंत संबंधित महिलेला योजनेचा लाभ दिला जाईल. लाभार्थींचे बँक खाते असणे बंधनकारक आहे. लाभार्थी कुटूंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे. त्यासाठी महिलांना ऑनलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे त्यांना उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, लाभार्थीचे आधार कार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट साईज फोटो, बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स, अटी-शर्तींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र आदी कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
माझी लाडकी बहीण योजनेची ऑनलाईन लाभार्थी यादी कशी तपासणार?
‘माझी लाडकी बहीण योजना’ पात्रता यादीमध्ये आपले नाव आहे की नाही हे ऑनलाइन पद्धतीने जाणून घेता येणार आहे. ज्या महिलां लाभार्थ्यांनी या योजनेंतर्गत अर्ज केले आहेत, त्या महिला या योजनेशी संबंधित त्यांच्या अर्जांची स्थिती तपासू शकणार आहे. योजनेच्या लाभार्थींना त्यांचे नाव तपासण्यासाठी पुढीलप्रमाणे प्रक्रियेचा अवलंब करावा. यामध्ये लाभार्थीनी सर्वप्रथम त्यांच्या फोनवर प्ले स्टोअरवरून ‘नारी शक्ती दूत’ ॲप डाऊनलोड करावे. त्यानंतर पुढील नवीन पेजवरील सर्व माहिती नीट भरुन मग अर्ज उघडावा लागेल. त्यानंतर मुख्य पृष्ठावर माझी लाडकी बहीण योजनेचा पर्याय दिसेल. तो पर्याय निवडायचा आहे. तेथे लाभार्थी यादी पाहण्याचा पर्याय सापडेल. त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे यादीमध्ये नाव आहे की नाही तपासू शकता. तुमचे नाव लाभार्थी यादीत समाविष्ट असल्यास, योजनेंतर्गत तुमच्या बँक खात्यात पैसे पाठवले जातील.
या कार्यक्रमात अंगणवाडी सेविका आणि महिला लाभार्थ्यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले. यामध्ये जिंतूर तालूक्यातील दुधवाग येथील पूजा राऊत म्हणाल्या की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेअतंर्गत मिळालेल्या 3 हजार रुपयांचा मला स्पर्धा परिक्षेची पुस्तके खरेदी करण्यासाठी उपयोग होणार आहे.’ तर पाथरी तालुक्यातील रेणाखळी येथील मिरा इंगळे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या पैशांचा उपयोग माझ्या मुलांची फिस भरण्यासाठी होणार असल्याचे सांगितले.’ परभणी येथील पद्मा गायकवाड म्हणाल्या की, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेंतर्गत मला प्राप्त झालेले 3 हजार माझ्यासाठी 3 लाखांपेक्षा जास्त आहेत. मी विधवा आहे. माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी या पैशांचा मला उपयोग होणार आहे.’
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनीही समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमास यावेळी जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख, अंगणवाडी सेविका आणि लाभार्थी महिलांची मोठ्या संख्येचे उपस्थिती होती.