शिक्षकांचे प्रश्न सर्वप्रथम निकाली काढणार : खासदार सुप्रिया सुळे
परभणीतील राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या विभागीय शिक्षक संवाद मेळाव्याला मोठा प्रतिसाद, प्रा.किरण सोनटक्के यांचा पुढाकार
परभणी : राज्यात येणारे सरकार आपलेच असणार आहे. त्यामुळे संवाद मेळाव्यात शिक्षकांचे जे काही प्रश्न, समस्या मांडल्या गेल्या आहेत. त्या सरकार आल्यावर सर्वप्रथम निकाली काढणार, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी रविवारी दिली.
परभणी येथे रविवारी, २५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शिक्षक सेल आणि मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्राध्यापक किरण सोनटक्के यांच्या वतीने मराठवाडा विभागीय शिक्षक संवाद मेळावा आयोजिण्यात आला होता. मेळाव्याला ऑनलाईन मार्गदर्शन करतांना खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजय गव्हाणे, आमदार सुरेश वरपूडकर, माजी आमदार जयप्रकाश दांडेगावकर, जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे, माजी आमदार व्यंकटराव कदम, प्रा.सुशिला मोराळे, पदवीधर सेलचे डॉ.नरेंद्र काळे, शिक्षक सेलचे राज्याध्यक्ष दिलीप सोनवणे, जाकेरलाला, भीमराव हत्तीअंबिरे, मनिषा केंद्रे, प्रेक्षा भांबळे, शितल सोनटक्के, रितेश काळे, केशव दुधाटे, बी.आर.कुंडगीर, भगवानराव वाघमारे, गोविंद उगले, विकास लंगोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षकांच्या कार्यक्रमांमध्ये नेहमीच काही तरी नवीन शिकायला, ऐकायला मिळते, असे नमूद करीत खासदार सुप्रिया सुळे यांनी मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के यांचे विशेष कौतुक केले. प्रास्ताविकात प्रा.सोनटक्के यांनी शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यां ठरावाद्वारे मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने टप्पा अनुदान लवकरात लवकर देण्यात यावे, जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करण्यात यावी, कला व क्रीडाच्या अंशकालीन कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावे, वरिष्ठ प्राध्यापकांना अर्जित रजा देण्यात याव्यात, आरटीई कायद्याची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यात यावी, अंगणवाडीताईंना सेवेत कायम करण्यात यावे आदींसह विविध या मागण्यांचे ठराव मंजूर करण्यात आले. ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. सूत्रसंचालन सुभाष ढगे यांनी केले. दरम्यान, परभणी शहरात प्रथमच शिक्षकांसाठी भव्यस्तरावर शिक्षक संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. मराठवाड्यातील सुमारे पाच हजार शिक्षक, शिक्षिका मेळाव्याला उपस्थित होत्या. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्रा.किरण सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष गोपाळ भुसारे, केशवअण्णा दुधाटे, सदाशिव होगे, धनंजय भागवत, गुलाब कदम, मोतीराम शिंदे, खिस्ते आदींसह जिल्हा व तालुका शिक्षक सेलच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.