मेजर ध्यानचंद जयंती : प्रिन्स सीबीएसई स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात
सेलू : श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल.के.आर.रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल येथे गुरुवारी (२९ ऑगस्ट) राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून “ध्यानचंद सिंग जयंती” उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे होते. यावेळी प्राचार्य कार्तिक रत्नाला, प्राचार्या प्रगती क्षीरसागर रसागर, आणि शिक्षकवृंद यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. संजय रोडगे म्हणाले की, हॉकी हा एक सांघिक खेळ असून, यात खेळाडू स्टीकच्या मदतीने चेंडू विरुद्ध संघाच्या गोलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात. हा खेळ पुरुष आणि महिलांसाठी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळला जातो. महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ऑलिंपिक, कॉमनवेल्थ खेळ, हॉकी विश्वचषक, चँपियन्स चषक आणि युवा हॉकी विश्वचषक यांचा समावेश होतो. जगभरातील फुटबॉल आणि क्रिकेटनंतर हॉकी हा खेळ सर्वाधिक खेळाडू असलेला खेळ आहे.
ध्यानचंद सिंग (२९ ऑगस्ट १९०५ – ३ डिसेंबर १९७९) हे भारतीय हॉकीचे नावाजलेले खेळाडू होते. त्यांना जगातील सर्वोत्तम हॉकी खेळाडू म्हणून ओळखले जाते. ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हणून संबोधले जायचे. त्यांनी भारताला १९२८, १९३२ आणि १९३६ मध्ये ऑलिंपिक सुवर्ण पदके मिळवून दिली. त्यांच्या काळात भारतीय हॉकी संघाला सर्वात शक्तिशाली संघ म्हणून ओळखले जायचे. ध्यानचंद यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ४०० हून अधिक गोल केले, ज्यामुळे ते हॉकी इतिहासातील सर्वाधिक गोल करणारे खेळाडू ठरले. त्यांच्या स्मरणार्थ भारत सरकारने १९५६ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या क्रीडा योगदानाची दखल घेत “राजीव गांधी खेलरत्न” पुरस्काराचे नाव बदलून “मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार” असे ठेवले आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त देशभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता बलैया यांनी केले.