‘निम्नदुधना’तून १०१६ क्युसेक विसर्ग नदीपात्रात
सेलू : सेलू (जि.परभणी) तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील निम्नदुधना धरणाचे दोन दरवाजे रविवारी, ८ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता ०.१५ मीटरने उघडून १०१६ क्युसेक विसर्ग दुधना नदीपात्रात करण्यात येत आहे. धरणाची जलाशय पाणीपातळी ४२५.२१० मीटर असून जीवंत साठा १८१.७८० दलघमी (७५.०५ टक्के) आहे. सद्यस्थितीत दोन दरवाजे प्रत्येकी ०.१५ मीटरने सुरू आहेत. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे निम्न दुधना प्रकल्प, पूर नियंत्रण कक्षाने कळविले आहे.