मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा : पारडीची जिल्हा परिषद शाळा सेलू तालुक्यात प्रथम
‘आनंदाचं झाड’ नावाने उपक्रमशील शाळा म्हणून ओळख निर्माण करणारी शाळा
सेलू/परभणी : उपक्रमशीलतेने आपली ओळख निर्माण करणाऱ्या सेलू तालुक्यातील पारडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-दोन अभियानात सहभागी होऊन सुधारित निकषांची पूर्तता करत जिप गटात सेलू तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळविला आहे.
मुख्याध्यापक डी.के.कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात शाळेने सहभाग घेतला होता. शालेय लेझिम पथक, स्काऊट गाईड, परसबाग आदी बाबी श्याम रुपणर यांनी उत्कृष्टपणे तयार केल्या होत्या. वर्ग सजावट, सुंदर अक्षर योजना, शालेय शैक्षणिक साधन निर्मिती यात संजय काकडे यांनी प्रमुख भूमिका पार पाडली. ऑनलाईन नोंदणी व तत्सम सर्व कार्य, शालेय वृक्ष संवर्धनात योगेश काळे यांनी सहभाग देत शाळेला स्पर्धेत गुण मिळवून दिले. नव्यानेच रुजू झालेले गणेश अकलोड यांनी अभियानातील सर्व निकष पूर्ण करण्यासाठी सर्वांगी भूमिका पार पाडली. विविध स्पर्धा परीक्षा, सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थी गुणवत्ता यासाठी युवराज माने यांनी आपली भूमिका पार पाडली. याशिवाय शालेय मंत्री मंडळाने महत्वपूर्ण योगदान दिले. या सर्व बाबींचा शाळेच्या यशात प्रमुख वाटा आहे.
तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल जिपचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, शिक्षणाधिकारी सुनील पोलास, उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत, सरपंच नीला आडे, पोलीस पाटील साहेबराव राठोड, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन आडे, माजी सरपंच माऊली राठोड, विठ्ठलराव राठोड, शिवाजी लंघे, अमोल आडे आदींसह गावकरी व शिक्षण क्षेत्रातून शाळेचे अभिनंदन होत आहे.